प्राचार्य रोकडे कर्मवीरांचे सच्चे वारसदार = प्रताप देवरे
श्रीरामपूर (प्रतिनिधी )
रयत शिक्षण संस्था ही प्रामाणिक कार्यकर्ते,प्राचार्य, प्राध्यापक,शिक्षक, विद्यार्थी यांच्यामुळेजगात लोकप्रिय ठरली, याच वाटेवरील संस्थेचे माजी सहसचिव प्राचार्य वसंतराव रोकडे हे सच्चे कर्मवीर विचारांचे वारसदार होते, असे भावपूर्ण उदगार स्नेहग्रुप संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष प्रताप देवरे यांनी काढले.
येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात प्राचार्य वसंतराव सावळेराम रोकडे यांच्या निधनानंतर शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी प्रताप देवरे बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक भागचंद औताडे पाटील होते.प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी प्राचार्य रोकडे यांच्या जीवनप्रवास आणि रयत शिक्षण संस्थेतील योगदानाची माहिती दिली, 'वटवृक्षाच्या छायेत'आत्मचरित्र आणि प्राचार्य डॉ.शन्करराव गागरे लिखित 'वसंत झेप 'या पुस्तकावरील संदर्भ सांगितले, याप्रसंगी गोरक्षनाथ बनकर, लेविन भोसले,सुभाष तोरणे,फकिरा वाघमारे, दीपक कदम, नानासाहेब रेवाळे, प्रमोद गाडेकर,निवृत्ती वमने, बापूसाहेब तुपे, लक्ष्मण मोहन, सुरेश देवकर, विलास निकम, नाना बडाख, बाबासाहेब चेडे, रावसाहेब मगर आदिंनी आपल्या भावना व्यक्त करीत प्राचार्य रोकडे यांच्या संस्कार आणि शिस्तबद्ध शिक्षणविषयी आठवणी सांगितल्या. प्रताप देवरे यांनी पुढे सांगितले की, आम्ही गोरगरिबांची मुले असल्याने आर्थिक आणि शैक्षणिक समस्या होत्या, तरुण वयात शिक्षणाचे महत्व वाटत नव्हते,अंगी चपळता आणि बंडखोरी होती, परंतु प्राचार्य रोकडे यांनी जीवनाला आपलेपणाने वळण लावले म्हणून आम्ही शिकलो, शिक्षक झालो, 1981ते 1986या काळातील बोरावके कॉलेजमधील अनेक आठवणी सांगून रयत शिक्षण संस्थेतील माजी विद्यार्थी संघटन असलेल्या 'स्नेहग्रुपतर्फे प्राचार्य रोकडे यांना अभिवादन केले. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी प्राचार्य रोकडे यांच्यामुळे च आपले एम. ए. मराठी शिक्षण कसे झाले त्या आठवणी सांगितल्या. प्राचार्य व. सा. रोकडे यांचे 15 फेब्रुवारी 1932ते 04 जुलै 2022 हे 90 वर्षाचे आयुष्य म्हणजे एका प्रामाणिक शिक्षणतपस्वी व्यक्तिमत्वाची ज्ञानज्योत असल्याचे सांगून वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे अभिवादन करून उपस्थितांना 'समाजचिंतन'पुस्तके देऊन प्राचार्य रोकडे यांना शब्दनमन करीत सूत्रसंचालन केले.विलास निकम यांनी आपल्या सामाजिक जाणिवेतून समारोप केला.