बनावट नोटा छापण्याचा कारखाना उघडकीस: राहुरी पोलिसांची मोठी कारवाई.
बनावट नोटा छापण्याचा कारखाना उघडकीस;
राहुरी पोलिसांची मोठी कारवाई.
प्रतिनिधी _ प्रसाद घोगरे _ ९३७०३२८९४४.
अहिल्यानगर, २९ जून २०२५, राहुरी पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत बनावट नोटा छापणारे रॅकेट उघड केले असून, या प्रकरणात सोलापूर आणि कर्जत तालुक्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ₹७०,७३,९२० किमतीचा बनावट नोटा आणि छपाईसाठी वापरले जाणारे अत्याधुनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई २८ जून २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता करण्यात आली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक राहुरी शहरात गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, तीन अज्ञात इसम बनावट नोटा घेऊन अहिल्यानगरहून राहुरीकडे येत आहेत.
त्यानंतर पोलीस पथकाने संत गाडगेबाबा विद्यालयाजवळ सापळा रचून खालील आरोपींना ताब्यात घेतले:
1. पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (वय ३३) – रा. सोलापूर
2. राजेंद्र कोंडीबा चौघुले (वय ४२) – रा. कर्जत, जि. अहिल्यानगर
3. तात्या विश्वनाथ हजारे (वय ४०) – रा. पाटेगाव, ता. कर्जत
या तिघांकडून शंकास्पद नोटा मिळाल्याने Axis बँकेचे शाखा व्यवस्थापक कैलास वानी यांना बोलावण्यात आले. त्यांनी प्राथमिक तपासात सदर नोटा बनावट असल्याचे स्पष्ट केले.
तपासादरम्यान आरोपींनी बनावट नोटा तयार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील शितलनगर भागात भाड्याने घर घेतल्याचे सांगितले. त्या ठिकाणी छापा टाकल्यावर खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
बनावट नोटा छपाईसाठी लागणाऱ्या यंत्रणा व साहित्य:
झेरॉक्स व प्रिंटर मशीन, कटिंग मशीन, नोटा मोजण्याचे मशीन, लॅमिनेशन मशीन, कंट्रोलर युनिट, विशेष छपाईसाठी वापरले जाणारे कागद

बनावट चलन:
₹५०० च्या नोटांचे ७५ बंडल — ₹३७,५०,०००, ₹२०० च्या नोटांचे ४४ बंडल — ₹८,८०,०००, ₹५०० चे कट न केलेले प्रिंटेड नोटांचे बंडल — ₹१८,००,०००
एकूण मुद्देमाल — ₹७०,७३,९२०
या आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७२४/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १७९, १८० आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान असेही निष्पन्न झाले की, हे आरोपी पूर्वीही अशाच स्वरूपाच्या गुन्ह्यात सोलापूर जिल्ह्यातील कुडूवाडी पोलीस ठाण्यात अटकेत होते, आणि त्या गुन्ह्यात त्यांनी २२ महिने तुरुंगवास भोगला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,
अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,
उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली झाली.
कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी:
पोउपनि. संदिप मुरकुटे, पोहेकॉ. सूरज गायकवाड, राहुल यादव, विजय नवले, संदिप ठाणगे, पोकॉ. सतीश कुर्हाडे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, गणेश लिपणे, नदिम शेख, सपोनि. सुदाम शिरसाट, पोउपनि. राजू जाधव, पोहेकॉ. साळवे, शिंदे, पोकॉ. पाखरे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. संदिप मुरकुटे हे करत आहेत.








