घोडेगाव शिवारात वृद्ध दाम्पत्याला अडवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटले
घोडेगाव शिवारात वृद्ध दाम्पत्याला अडवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटले!
चांदा ते शनिशिंगणापूर रस्त्यावर घोडेगाव शिवारातील बराटे वस्ती परिसरात दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला अडवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना सोमवार (दि. २३ नोव्हेंबर) रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सुमारे ६३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले असून, याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात तीन अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या पोलिसांच्या माहितीनुसार, चांदा येथील संकेत रघुनाथ वमन (वय ७७, व्यवसाय शेती) हे आपल्या पत्नीसह मोटारसायकल (स्कुटी क्रमांक एमएच १७ सीएन ४२७६) वरून वडाळा येथे आजारी नातेवाइकांना भेटण्यासाठी जात होते. घोडेगाव शिवारातील बराटे वस्ती परिसरात चांदा ते शनिशिंगणापूर मार्गावरून प्रवास करत असताना त्यांच्या पाठीमागून एका मोटारसायकलवरून आलेल्या तीन अनोळखी चोरट्यांनी त्यांना गाठले. चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला समोरून अडवून रस्ता कुठे जातो, अशी विचारणा केली. त्यानंतर काही समजण्याच्या आतच फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने तोडून तिघांनी मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वृद्ध दाम्पत्य घाबरून गेले.चोरट्यांनी लंपास केलेल्या ऐवजात तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, , तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी,, तसेच तुळशीची माळ यांचा समावेश आहे. एकूण सोन्याच्या दागिन्यांची किंमत ६३ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव व पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०४ (२) व ३ (५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एम. लबडे करीत आहेत.
दिवसा साडेतीन वाजण्याच्या सुमारास वर्दळीच्या मार्गावर वृद्ध दाम्पत्याला अडवून दागिने लुटण्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित दुचाकींची माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.








