भिम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दिपक साळवेंच्या पाठपुराव्याचा दणका ; बेकायदेशीर उत्खनन करणाराचा तहसिलदारांनी मोडला मणका , ठोकला 14 लाख 10 हजारांचा दंड

भिम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दिपक साळवेंच्या पाठपुराव्याचा दणका ; बेकायदेशीर उत्खनन  करणाराचा तहसिलदारांनी मोडला मणका , ठोकला 14 लाख 10 हजारांचा दंड

भिम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन चे जिल्हाध्यक्ष दिपक रामजी साळवे यांच्या पाठपुराव्याला यश 

राहुरी तहसीलदार यांच्या कडुन 

मुळा नदीपात्रालगत बेकायदेशीर मुरूम व कारगळ प्रकरणी 14 लाख 10 हजारांचा दंड!

फिरोज इकबाल शेख यांना तहसीलदारांची मागणी नोटीस; 15 दिवसांत रक्कम भरण्याचे आदेश

राहुरी शहरातील मुळा नदीपात्रालगत तसेच स्मशानभूमी परिसरात करण्यात आलेल्या कथित मुरूम व कारगळ साठा प्रकरणी राहुरी तहसील कार्यालयाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात श्री. फिरोज इकबाल शेख, रा. राहुरी बुद्रुक यांना तब्बल 14 लाख 10 हजार 974 रुपये भरण्याबाबत मागणीची नोटीस बजावण्यात आली आहे. तहसीलदार कार्यालयाकडून 2 नोव्हेंबर 2026 रोजी ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

राहुरी बुद्रुक येथील गट क्रमांक 11 मधील स्मशानभूमीच्या दक्षिण बाजूने तसेच मुळा नदीपात्रालगत उत्तर बाजूने अंदाजे 101.76 ब्रास मुरूम व कारगळ साठा केल्याचा उल्लेख तहसील कार्यालयाने बजावलेल्या नोटिशीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी राहुरी तहसील कार्यालयाकडून गौणखनिज दंड आदेश क्रमांक कावि/गौम/500/2026, दिनांक 27 जुलै 2026 अन्वये संबंधित व्यक्तीकडे 14 लाख 10 हजार 944 रुपये दंडाची रक्कम येणे बाकी असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

सदर नोटीस प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत संपूर्ण थकबाकीची रक्कम आणि नोटीस खर्च भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दिलेल्या मुदतीत रक्कम न भरल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 174 अन्वये संबंधित व्यक्तीविरुद्ध थकबाकी वसुलीसाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. तसेच थकबाकीच्या एक-चतुर्थांशापेक्षा अधिक नसलेली रक्कम अतिरिक्त दंड म्हणून आकारण्यात येऊ शकते, असेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.

या नोटिशीची प्रत ग्राम महसूल अधिकारी, राहुरी बुद्रुक यांना पाठविण्यात आली आहे. संबंधित नोटीस बजावून त्याची दिनांकासह स्वाक्षरी केलेली प्रत तहसील कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित व्यक्तीच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा तपशील आणि अहवाल कार्यालयास सादर करण्याबाबतही कळविण्यात आले आहे.

मुळा नदीपात्र आणि परिसरातील गौणखनिज उत्खनन व वाळूसाठ्याच्या विषयावर महसूल विभागाने घेतलेल्या या भूमिकेमुळे परिसरात चर्चेला सुरुवात झाली आहे. शासनाच्या गौणखनिज नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर आर्थिक दंडात्मक कारवाई होऊ शकते, हे या नोटिशीवरून स्पष्ट होत आहे.

आता संबंधित व्यक्ती निर्धारित 15 दिवसांच्या मुदतीत दंडाची रक्कम भरते की महसूल विभागाकडून पुढील वसुलीची कारवाई केली जाते, याकडे राहुरीकरांचे लक्ष लागले आहे.