फटाक्याच्या दुकानातील पैशाच्या वादातून खून ; दोन आरोपी 24 तासात जेरबंद
फटाक्याच्या पैशावरून वाद, कार अंगावर घालून खून; दोन आरोपी २४ तासांत जेरबंद
चांदा (प्रतिनिधी) फटाक्याच्या दुकानात पैशाच्या वादातून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.
दि. ८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता कामगार चौक, टिळकनगर येथे फिर्यादी मोईनुद्दीन शकील पठाण यांनी दिवाळीनिमित्त फटाक्याचे दुकान टाकले होते. यावेळी सागर गुंगेकर, आनंद पवार, अमित पठारे, उमर शेख व इतरांनी फटाके घेऊन पैसे न देण्यावरून वाद घातला. यात अमित पठारे याने तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचे चुलते शफी नवाब पठाण यांच्या अंगावर दोन वेळा स्विफ्ट कार घालून त्यांना ठार मारले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, अशोक लिपणे, रमीजराजा आत्तार, भगवान थोरात, सुनिल मालनकर, प्रशांत राठोड, अरुण मोरे, ज्ञानेश्वर शिंदे व दत्तात्रय गव्हाणे यांच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उमर समीर शेख (वय २२) व अमित रविकांत पठारे (वय २९) या दोघांना वांजुळकी, ता. नेवासा येथून ताब्यात घेतले.
पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.








