म्हाळस पिंपळगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून 70 हजारांचा ऐवज लंपास
म्हाळस पिंपळगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून ७० हजारांचा ऐवज लंपास.
नेवासा तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव गावाच्या शिवारात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुल सुभाष गाडेकर (वय २९, रा. म्हाळस पिंपळगाव, उक्कडवाडी, ता. नेवासा) यांच्या राहत्या घराच्या बंद दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी कशाच्या तरी साहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली १० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सुमारे ६० हजार रुपये किमतीचे दीड तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये आई मिनाबाई, पत्नी अमृता व आजी गंगूबाई यांचे कानातील लहान सोन्याचे दागिने तसेच गळ्यातील जुने सोन्याचे दागिने असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
या प्रकरणी राहुल गाडेकर यांच्या फिर्यादीवरून शनीशिंगणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर १८६/२०२६ बिएन एस चे कलम ३३१(४), ३०५(अ), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास शनीशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळवे करीत आहेत.








