पैशाच्या वादातून व्यापाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण; पती - पत्नीवर गुन्हा दाखल .
*पैशाच्या वादातून व्यापाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण; पती-पत्नीवर गुन्हा*
पैशाच्या देवाण-घेवाणीतून झालेल्या वादात व्यापाऱ्याला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात पती-पत्नी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशफाक निसार शेख (वय ४५, व्यवसाय - व्यापार, रा. चांदा, ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे. बाबुराव राजसाहेब थोरात व लता बाबुराव थोरात (दोघे रा. लोहारवाडी रोड, चांदा, ता. नेवासा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चांदा ते लोहारवाडी जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादी व आरोपींची भेट झाली. यावेळी पैशाच्या देवाण-घेवाणावरून वाद सुरू झाला. आरोपींनी फिर्यादीकडे पैशांची मागणी केली असता, फिर्यादीने यापूर्वीच पैसे दिले असून सध्या आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. याच कारणावरून वाद चिघळला.
संतप्त झालेल्या बाबुराव थोरात याने जवळ पडलेला लाकडी दांडका उचलून फिर्यादीच्या डोक्यात, पाठीत, मानेवर तसेच हातावर मारहाण केली. त्यानंतर लता थोरात हिनेही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच "आमचे पैसे दिले नाहीत तर जीवे ठार मारून टाकू," अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर फिर्यादीने सोनई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी गु.र.नं. ४७२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ४८४ चौधरी करीत आहेत.








