सोनई पोलीस ॲक्शन मोडवर ; कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या 12 गोवंशीय जनावरांची सुटका
*सोनई पोलिसांची मोठी कारवाई : कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या १२ गोवंशीय जनावरांची सुटका, पिकअप वाहनासह ४ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*
सोनई पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या १२ गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. यामध्ये पिकअप वाहनासह ४ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २२/११/२०२६ रोजी रात्री सोनई पोलीस स्टेशनचे पोलीस तमनर चापेओळे व इतर महेबुब शेख, व होमगार्ड बोडे हे सरकारी फर्स्ट मोबाईल वाहनाने पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, रात्री २३/११/२०२६ रोजी मध्यरात्री ००.४५ वाजेच्या सुमारास पोलीस तमनर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, झापवाडी रोड, लोंढे वस्ती, घोडेगाव (ता. नेवासा) येथे एका टेम्पोमध्ये गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने भरून ठेवलेली आहेत.
सदर माहिती मिळताच त्यांनी प्रभारी अधिकारी सपोनि श्री. माणिक चौधरी यांना माहिती देऊन आदेशान्वये मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस पथकाने पंचासमक्ष रात्री ०१.३० वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला. तेथे पांढऱ्या-निळ्या रंगाच्या पिकअप वाहन क्र. MH 05 EL 5211 यात तीन इसम गोवंशीय जनावरे भरताना आढळून आले.
पोलिसांची चाहूल लागताच तिन्ही आरोपी अंधाराचा फायदा घेत पिकअप जागीच सोडून पळून गेले. पोलिसांनी पाहणी केली असता, त्यामध्ये लहान-मोठे असे एकूण १२ गायीचे नर जातीचे गोऱ्हे चारा-पाण्याविना दाटीवाटीने व निर्दयतेने बांधून ठेवलेले आढळून आले.
जप्त मुद्देमाल
१) ४,००,०००/- रु. किंमतीचा एक पांढऱ्या-निळ्या रंगाचा पिकअप वाहन (क्र. MH 05 EL 5211)
२) ३४,०००/- रु. किंमतीचे १२ गोवंशीय जनावरे (गोऱ्हे)
एकूण - ४,३४,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त
सदरचा गुन्हा हा करण रमेश शिंदे रा. तामसवाडी, ता. नेवासा - पिकअप चालक व त्याचे सोबतचे दोन अनोळखी साथीदार यांनी केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने याप्रकरणी सोनई पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५०२/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) चे कलम ५(अ), ५(ब), ९ सह प्राण्यांना निर्दयतेने वागविणे प्रतिबंधक कायदा कलम ३, ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेको/१५९६ डी.एम. गायकवाड नेम. सोनई पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे श्रीरामपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू शेवगाव विभाग शेवगाव, यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी प्रभारी अधिकारी सोनई पोलीस स्टेशन, पोउपनि. किशोर जाधव, श्रेणी पोसई बाबासाहेब लवंडे, पोहेको/१४१० एच.एस. तमनर, चापेओळे/५५८ बी.एम. शेख पोना/१६२८ जी. पी. गायकवाड, पोंका/१४२६ आर.एन. तमनर, मपोका/६७८ बी.के. गोर, सर्व नेम. सोनई पोलीस स्टेशन होम बोडे होमगार्ड पथक नेवासा यांनी केली आहे.








