राहुरी कृषी विद्यापीठात ऊस पिकावरील एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न .
*राहुरी कृषि विद्यापीठात ऊस पिकावरील एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न*
*ऊस पिकावरील किडींच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने तयार केलेल्या जैविक किडनाशकांचा वापर करावा**- कुलगुरु डॉ. विलास खर्चे*

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये राहुरी कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या फुले 86032 व को-265 या वाणांचे योगदान मोठे आहे. काही शेतकऱ्यांनी ऊस वाणांचे नाव आपल्या घरांना दिले आहे. अशा या महत्वाच्या नगदी पिकामध्ये हुमणी, पायरीला व लोकरी मावा या किडींची समस्या यावर्षी वाढली आहे. या किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरी बांधवांनी कृषि विद्यापीठाने तयार केलेल्या जैविक किडनाशकांचा वापर करावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील किटकशास्त्र विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पिकावरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाद्वारे (क्रॉपसॅप) व सेवा संकल्प अभियान-2026 अंतर्गत कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव यांचेकरिता ऊस पिकावरील हुमणी व पायरीला किडीचे नियंत्रण या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरुन कुलगुरु डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन मल्हारवाडी येथील एनएसबी फार्मचे अध्यक्ष राजेंद्र येवले उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संचालक शिक्षण डॉ. साताप्पा खरबडे, किटकशास्त्र विभाग प्रमुख तथा प्रमुख अन्वेषक (क्रॉपसॅप) डॉ. उत्तम कदम, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे, राहुरीचे तालुका कृषि अधिकारी बापूसाहेब शिंदे व प्रगतशील शेतकरी लक्ष्मण गाडे उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरु डॉ. विलास खर्चे मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की कृषि विद्यापीठामध्ये 10 वर्षांपासून विविध पिकांच्या हवामान अनुकुल वाण निर्मितीवर भर दिला जात आहे. सध्या वाण निर्मितीसाठी 8-10 वर्षांचा कालावधी लागतो. हा कालावधी कमी करण्यासाठी स्पीड ब्रिडींग या तंत्रज्ञानाचा वापर करण्याबद्दल प्रक्रिया सुरु आहे. प्रत्येक पिकातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवादाचे कार्यक्रम घेण्यात येतील. यामध्ये आपल्या सुचना आम्हाला संशोधनासाठी मोलाच्या ठरतील. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ पुढाकार घेईल अशी ग्वाही कुलगुरु डॉ. खर्चे यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. डॉ. प्रशांत बोडके आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की महाराष्ट्रात उसाचे 14.71 लाख हेक्टर क्षेत्र आहे. देशात 25 कोटींपेक्षा जास्त लोकांची उपजीविका ही ऊस पिकावर अवलंबून आहे. विद्यापीठाने पुढील 20 वर्षात येणाऱ्या अडचणींवर मात करत सहनशील वाणांची निर्मिती केली असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. साताप्पा खरबडे बोलतांना म्हणाले की हवामानातील बदल, पर्जन्यमानात तसेच रात्रीच्या तापमानात झालेली घट याचा परिणाम किडींच्या जीवनचक्रावर होत आहे. या किडींचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी विद्यापीठाने मेटारायझियम ॲनासोप्ली, फुले सुपर बायोमिक्स यासारख्या जैविक किडनाशकांची निर्मिती केली आहे. शेतकरी बांधवांनी रासायनिक किडनाशकांचा वापर कमी करुन जैविक किडनाशकांचा वापर वाढवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी झालेल्या तांत्रिक चर्चासत्रात डॉ. उत्तम कदम यांनी उसावरील पायरीला किडीचे व्यवस्थापन, डॉ. राजेंद्र भिलारे यांनी उसाचे सुधारीत वाण, डॉ. सखाराम आघाव यांनी उसावरील हुमणी किडीचे व्यवस्थापन आणि राजेंद्र येवले यांनी किफायतशीर शेतीसाठीची पंत्रसूत्री या विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले. यावेळी बापुसाहेब शिंदे, कृषिभूषण सुरसिंग पवार, अण्णासाहेब बाचकर, वसंतराव गाडे, समिरभाई पठाण, अमित धिमते, साईनाथ बेल्हेकर, निर्मला गाढे, यमुनाथ आघाव, सुदाम पवार, लक्ष्मण गाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डिग्रस, सडे, तांभेरे, गोटुंबा आखाडा, बारागाव नांदुर व तमनर आखाडा येथील शेतकऱ्यांनी कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उत्तम कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. सखाराम आघाव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने, मेजर ताराचंद गागरे यांच्यासह डिग्रस, सडे, तांभेरे, गोटुंबा आखाडा, बारागाव नांदुर, तमनर आखाडा व तांभेरे या गावातील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्स शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








