जवाहर विद्यालय चांदा येथे संविधान दिन उत्साहात साजरा
जवाहर विद्यालय चांदा येथे संविधान दिन उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांना मूलभूत अधिकार व ११ कर्तव्यांचे सविस्तर मार्गदर्शन; संविधानाच्या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन

चांदा येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्ये तसेच लोकशाही मूल्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. अधिकारांसोबतच कर्तव्यांची जाणीव ठेवून जबाबदार आणि आदर्श नागरिक बनण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. भोजने सर होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. तांबे सर, सासे सर आणि आव्हाड सर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांनी ‘आम्ही भारताचे लोक...’ या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.
प्रा. भगवान भाबड यांचे विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन
यावेळी मार्गदर्शक प्रा. भगवान भाबड यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या सहा मूलभूत अधिकारांची माहिती सोप्या व उदाहरणांसह समजावून सांगितली.
यामध्ये समतेचा अधिकार स्पष्ट करताना जात, धर्म, लिंग किंवा इतर कोणत्याही आधारावर भेदभाव न करता सर्व नागरिकांना समानतेची वागणूक मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. स्वातंत्र्याचा अधिकार सांगताना अभिव्यक्ती, विचार, शिक्षण आणि संचार स्वातंत्र्याचे महत्त्व विशद केले. शोषणाविरुद्धचा अधिकार समजावून देताना बालमजुरी, मानवी तस्करी आणि सक्तीच्या कामाविरोधातील घटनात्मक संरक्षणाची माहिती दिली.
तसेच धर्मस्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देतो, तर सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्यास संरक्षण देतात, असे त्यांनी सांगितले. याशिवाय ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार असल्याचे स्पष्ट करून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
११ मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्याचे आवाहन
केवळ अधिकारांची मागणी करून चालणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने आपली घटनात्मक कर्तव्येही प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत, असे सांगत प्रा. भाबड यांनी भारतीय संविधानातील ११ मूलभूत कर्तव्यांची माहिती दिली.
यामध्ये संविधानाचा आदर व पालन करणे, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान राखणे, स्वातंत्र्यलढ्यातील महान आदर्शांचे जतन करणे, देशाची एकता व अखंडता टिकवणे, गरज पडल्यास देशाचे रक्षण करणे, सर्व नागरिकांमध्ये बंधुभाव वाढवणे, महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, देशाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणे, पर्यावरण व नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन व मानवतावाद जोपासणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करून हिंसेचा त्याग करणे, तसेच वैयक्तिक व सामूहिक कार्यात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे या कर्तव्यांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच पालकांनी किंवा पालकप्रतिनिधींनी ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हेही घटनात्मक कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले."फक्त अधिकार मागून चालणार नाही, आधी आपली कर्तव्ये पार पाडायला शिका. अधिकार आणि कर्तव्ये ही नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हींचा योग्य समतोल राखल्यासच सक्षम लोकशाही आणि आदर्श समाजाची निर्मिती होऊ शकते," असा मोलाचा संदेश प्रा. भाबड यांनी विद्यार्थ्यांना दिला.
संविधानाचे पालन करून आदर्श नागरिक बना!यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. वाकचौरे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा भक्कम आधार असून प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्यांचा आदर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच शिस्त, समानता, बंधुभाव, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जोपासून आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोनावणे मॅडम यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संविधान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना केवळ अधिकारांची माहिती न देता कर्तव्यांची जाणीव करून देण्याचा हा उपक्रम लोकशाही मूल्यांची पायाभरणी करणारा ठरला.








