पोकरा प्रकल्पांतर्गत हवामान अनुकूल शेती प्रारूप निर्माण होणार
*पोकरा प्रकल्पांतर्गत हवामान अनुकूल शेती प्रारूप निर्माण होणार*
*फार्म ऑफ द फ्युचर' / भविष्यातील शेती प्रकल्पाला ब्राम्हणीत मिळणार गती**-कुलगुरू डॉ विलास खर्चे*
जागतिक हवामान बदलामुळे शेतीवर परिणाम होताना जाणवत आहे. खरीप व रब्बी हंगामातील पीक उत्पादनावर याचा फार मोठा परिणाम झालेला असून हवामान अनुकूल असे शेती तंत्रज्ञान विकसित करण्याचे व प्रत्येक घटकानुसार हवामानाधारित सल्ला देण्याचे आव्हान सर्व शास्त्रज्ञांसमोर आहे. त्या अनुषंगाने राज्य शासन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त सहकार्याने पोकरा प्रकल्पांतर्गत फार्म ऑफ द फ्युचर- भविष्यातील शेती प्रारूप राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे विकसित करण्यात येत असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषी विद्यापीठात राज्य शासनाच्या पोकरा प्रकल्प आणि भविष्यातील शेती उपक्रमांची दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. विलास खर्चे मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी राज्याचे कृषी सचिव श्री. परिमल सिंग ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोकराच्या प्रकल्प संचालिका श्रीमती मीनल करनवाल उपस्थित होत्या. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, शिक्षण संचालक डॉ. साताप्पा खरबडे, माजी संशोधन संचालक तथा पोकराचे सल्लागार डॉ. सुनील गोरंटीवार, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. सुधाकर बोराळे, बैठकीचे निमंत्रक कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख तथा पोकरा प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनील कदम उपस्थित होते.
डॉ. विलास खर्चे पुढे म्हणाले या प्रकल्पाद्वारे राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी गावात भौगोलिक माहिती प्रणाली (जि. आय. एस. ) द्वारे दूरसंवेदनाद्वारे प्राप्त माहिती, पिकांचे स्पेक्ट्रल सिग्नेचर (Spectral Signatures) आणि ड्रोनद्वारे प्राप्त प्रतिमा यांचे क्षेत्रीय निरीक्षणांसोबत एकत्रित विश्लेषनाद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील स्थानिक परिस्थितीनुसार वेळेवर आणि उपयुक्त कृषी सल्ला मिळणे शक्य होणार आहे. तसेच शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या अभिप्रायाच्या आधारे संबंधित सल्ला समजण्यास सुलभ आहे का, तो योग्य वेळी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो का आणि प्रत्यक्ष शेतात त्याची अंमलबजावणी करणे शक्य आहे का, याचे आकलन प्रकल्पाच्या पथकाला करता येईल, असे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक हवामान, पिकांची अवस्था आणि शेतकऱ्यांच्या गरजांचा अभ्यास करून डिजिटल कृषी व्यवस्थेचा शास्त्रीय पाया विकसित केला जात आहे. भविष्यात पीक निरीक्षण, हवामानावर आधारित सल्ला आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी उपयुक्त माहिती देणाऱ्या सेवा विकसित केल्या जाणार आहेत. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना आणि हवामानाशी संबंधित जोखीम कमी करणे अधिक सुलभ होऊ शकणार आहे.
मार्गदर्शन करतांना परिमल सिंग म्हणाले महात्मा फुले कृषी विद्यापीठत 'क्रॉप सिग्नेचर' (Crop Signature) डेटा उपलब्ध असल्याचे पुढील 'क्रॉप आयडेंटिफिकेशन' (पीक ओळख) संशोधनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. या प्रकल्पांतर्गत शेतातील सूक्ष्म हवामान, पिकांची वाढीची अवस्था, क्षेत्रीय निरीक्षणे, हवामानविषयक माहिती यांचे एकत्रित विश्लेषण केले जाणार आहे. त्याआधारे स्थानिक परिस्थिती, शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन शेत स्तरावर सूक्ष्म हवामानावर आधारित कृषी सल्ला सेवा विकसित करण्याचे नियोजन आहे.
पोकराच्या प्रकल्प संचालिका मीनल करनवाल मार्गदर्शनात म्हणाल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर अवलंब होणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक हवामान, पिकांची अवस्था आणि शेतकऱ्यांच्या गरजांचा अभ्यास करून डिजिटल कृषी व्यवस्थेचा शास्त्रीय पाया विकसित केला जात आहे. या द्वारे शेतकऱ्यांना त्याच्या शेतातील हवामानाधारित सल्ला मिळणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढणार आहे.
या प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुनील कदम यांनी प्रास्ताविक करून या बैठकीची उद्दिष्टे स्पष्ट केली. डॉ. सुनील गोरंटिवार यांनी पोकरा प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा सादर केला. डॉ. प्रशांत बोडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या दोन दिवसीय बैठकीत दूरसंवेदन आधारित प्रारूपे :पीक ओळख, पिकांवरील ताणाचे मूल्यांकन, जमिनीतील ओलावा व पाणी साचण्याची स्थिती,पीक उत्पादनाचा अंदाज व पूर्वानुमान, रिमोट सेन्सिंग आधारित पीक ताणाचे मूल्यांकन आणि पीक उत्पादनाचा अंदाज व पूर्वानुमान करणे, यामध्ये प्रमाणीकरण आणि प्रत्यक्ष कार्यपद्धतीतील उपयोग, आगामी खरीप हंगामासाठी पूर्वतयारी आणि कृती आराखडे तयार करणे, भविष्यातील शेती – ड्रोन आधारित शेतातील कामकाज : नियोजन आणि शेताचे नकाशे तयार करण्यासाठी प्रत्यक्ष ड्रोन उड्डाणांचे प्रात्यक्षिक, ड्रोन डेटा प्रक्रिया साखळी या विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. या वेळी मान्यवरांनी ब्राम्हणी गावात भेट देऊन सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. कार्यक्रमाचे स्वागत व आभार डॉ. सुनील कदम यांनी मानले. या बैठकीला पोकराचे अधिकारी, आयआयटी मुंबईचे शास्त्रज्ञ, अहिल्यानगर, परभणी, रत्नागिरी, अकोला येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठ परभणी, दापोली आणि अकोला येथील शास्त्रज्ञ उपस्थित होते.








