शनि शिंगणापूरमध्ये भाविकांना एजंटांचा त्रास ,वाहने अडवून पूजेचे साहित्य खरेदी साठी दबाव ; चौघांविरूद्ध गुन्हे दाखल
शनिशिंगणापूरमध्ये भाविकांची वाहने अडवून पूजेचे साहित्य खरेदीचा आग्रह; चौघांविरुद्ध गुन्हे दाखल
देशभरातून लाखो भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येत असलेल्या शनिशिंगणापूर येथे भाविकांची वाहने रस्त्यावर अडवून त्यांना पूजेचे साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकारांवर शनिशिंगणापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित चार जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १० नोव्हेंबर रोजी शनिशिंगणापूर येथील कुऱ्हाट पार्किंगसमोरील रोडवर सोनईकडून शनिदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या खासगी चारचाकी वाहनांना रस्त्यावर अडवून त्यांना पुढे जाण्यास प्रतिबंध करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली. या प्रकरणी सोनई येथील दादासाहेब लक्ष्मण थोरात (वय ४२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अध्यक्ष पार्किंग परिसरात भाविकांची वाहने अडवून त्यांना पूजेचे साहित्य आपल्या दुकानातून घेण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून राजेंद्र खंडू फुलसौंदर (वय ५०, रा. करजगाव, ता. नेवासा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याच दिवशी दुपारी ३.२० वाजण्याच्या सुमारास कुऱ्हाट पार्किंगसमोरील रोडवर भाविकांच्या वाहनांना अडथळा निर्माण केल्याच्या तक्रारीवरून युवराज प्रकाश जाधव (वय ४०, रा. श्रीरामपूर) यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दरम्यान, याच प्रकारातील आणखी एका घटनेत अध्यक्ष पार्किंग परिसरात भाविकांची वाहने अडवून त्यांना पूजेचे साहित्य दुकानातून घेण्यास प्रवृत्त केल्याच्या तक्रारीवरून सलीम बाबा सय्यद (वय ४८, रा. टाकळीमिया, ता. राहुरी) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, अहिल्यानगरचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी २९ जानेवारी २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार भाविकांच्या वाहनांना रस्त्यावर अडथळा निर्माण करण्यास प्रतिबंध असतानाही अशा प्रकारचे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे संबंधित आदेशाचा अवमान झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या चारही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता कलम १२६(२) व २२३ प्रमाणे शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भाविकांच्या श्रद्धेच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी जाताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि व्यावसायिक कारणासाठी भाविकांची अडवणूक होऊ नये, यासाठी पोलिसांनी कारवाई केली आहे.








