महात्मा फुले कृषी विद्यापीठातील चिक्कू फळाला मिळाला उच्चांकी दर .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठातील चिक्कू फळाला मिळाला उच्चांकी दर .
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील उद्यानविद्या विभागातील चिक्कू फळांच्या विक्रीतून एकूण 40 लाखांचा महसूल विद्यापीठास प्राप्त झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत चिक्कू फळापासून मिळणाऱ्या महसुलात 23 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. विद्यापीठातील उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावर कालीपत्ती, क्रिकेट बॉल इ. चिक्कू वाणांची दहा हेक्टर क्षेत्रावर चिक्कू फळबागा असून त्यात एकूण उत्पादनक्षम 972 फळझाडे आहेत. सदर फळांची विक्री ई निविदा पद्धतीने नुकतीच करण्यात आली.
चिक्कू फळांचे आहारातील वाढते महत्त्व लक्षात घेता दिवसेंदिवस ग्राहकांकडून चिक्कू फळांची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विद्यापीठातील चिक्कूची फळे गुणवत्ता तसेच चवीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे विद्यापीठातील चिक्कू फळबागा घेण्यासाठी यावर्षी व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यापीठातील चिक्कू फळबागांचे बारमाही व्यवस्थापन हे तांत्रिक व शास्त्रोक्त पद्धतीने केले जाते. याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के व उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. फळबागेचे योग्य व्यवस्थापन तसेच अधिक उत्पादनासाठी उद्यानविद्या प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन मगर, सहाय्यक उद्यानविद्यावेत्ता तसेच कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. विजय पवार आणि श्री. राहुल पाटील, कृषी सहाय्यक श्री. रमेश अनाप, श्री. सचिन शेळके, श्री. बाबासाहेब होडगर तसेच उद्यान विद्या विभागाचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.