महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा नाशिक येथील कार्डियन करेक्ट या संस्थेबरोबर सामंजस्य करार संपन्न .
*महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा नाशिक येथील कार्डियन करेक्ट या संस्थेबरोबर सामंजस्य करार संपन्न*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व नाशिक येथील कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल संस्थेबरोबर महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. युवा उद्योजक तयार करणे, शेतकर्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यापीठातील तंत्रज्ञान अवगत करणे, नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे व कार्डियन करेक्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र अमृतकर यांनी या करारावर स्वाक्षर्या केल्या. याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे मार्गदर्शन करताना म्हणाले की शेतीमध्ये मोठे बदल होत आहेत. शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहे. विद्यापीठातही विविध पिकांवर नाविन्यपूर्ण संशोधन झालेले आहे. हे संशोधन जास्तीतजास्त शेतकर्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर या सामंजस्य करारामुळे विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत जाण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे यांनी या सामंजस्य कराराबद्दल माहिती दिली. याप्रसंगी कार्डियन करेक्टचे श्री.रवींद्र अमृतकर यांनी त्यांच्या संस्थेमार्फत सध्या सुरू असलेल्या कम्युनिटी रेडिओ तसेच कृषि कौशल्य परिषदेमार्फत विविध फळांचे मूल्यवर्धन याविषयी माहिती दिली. यावेळी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, मृदशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, कृषि कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उत्तम कदम, उद्यानविद्या विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर शिरसागर, वरिष्ठ कापूस पैदासकार तथा कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल व कार्डियन करेक्टचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. भगवान देशमुख यांनी मानले.








