*विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तुरीचे व्यवस्थापन केल्यास उत्पादनात भरघोस वाढ.-डॉ. चांगदेव वायाळ.*
*विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तुरीचे व्यवस्थापन केल्यास उत्पादनात भरघोस वाढ*
*- डाॅ.चांगदेव वायळ*
*राहुरी विद्यापीठ, दि. 9 नोव्हेंबर, 2026*
कृषी विद्यापीठांनी विकसीत केलेल्या सुधारीत तंत्रज्ञानानुसार आणि कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानुसार जर शेतक-यांनी तुर या पिकाचे लागवडीपासून ते काढणीपर्यंत व्यवस्थापन केले तर तुरीचे भरघोस उत्पादन मिळेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वरीष्ठ किटकशास्त्रज्ञ डाॅ. चांगदेव वायळ यांनी केले.
महात्मा जोतिबा फुले यांच्या जन्मदिनाच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आणि खेत बचाओ अभियान आणि विद्यापीठ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उपक्रमांतर्गत विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी कुंभारगाव आणि पोटेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर येथील पाणी फाउंडेशनच्या शेतकरी गटांच्या प्रक्षेत्राला भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. चांगदेव वायाळ बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे माजी कडधान्य पैदासकार डॉ. नंदकुमार कुटे उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना डाॅ. वायाळ पुढे म्हणाले की या भागातील शेतकऱ्यांना पारंपारिक पद्धतीने शेती करून एकरी तुरीचे पाच ते सहा क्विंटल उत्पादन मिळायचे. आता पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप डिजिटल शेती शाळेमधून मिळणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरून आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केवळ दोन किलो बियाण्याचा वापर करून सुमारे एकरी 14 क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन मिळेल. पाणी फाउंडेशनच्या डिजिटल शेती शाळेद्वारे शेतकऱ्यांना विद्यापीठातील शास्त्रज्ञ ऑनलाईन पद्धतीने अविरत मार्गदर्शन करत असतात. शेती शाळेद्वारे विद्यापीठाने दिलेल्या तंत्रज्ञानाचा शेतकरी काटेकोर अवलंब करत असल्याने त्यांचे तुरीचे उत्पादन दुपटीने वाढले असल्याचे प्रतिपादन डॉ. वायाळ यांनी केले. माजी कडधान्य पैदासकार डाॅ. नंदकुमार कुटे म्हणाले की कडधान्य पिके म्हणजे शेतीच्या बांधावरची पिके अशी ओळख होती. परंतु विद्यापीठाचे सुधारित तंत्रज्ञान वापरून व शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुरीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे व्यवस्थापन केल्यापासून या गावातील शेतक-यांचे तुरीच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे.
यावेळी कुटूंब महिला शेतकरी गटाच्या निमंत्रक सौ. सुप्रियाताई धुमाळ व अन्नपूर्ण महिला शेतकरी गटाच्या निमंत्रक सौ. सारिकाताई कावळे व सौ. जयश्रीताई कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सौ. संगिताताई धुमाळ, सौ. सुनिताताई पानसरे, सौ. जयश्रीई कुलकर्णी व सौ. सारिकाताई कावळे यांच्या तुरीच्या प्रक्षेत्राला भेट देवून मार्गदर्शन केले व तंत्रज्ञान अवलंब केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी कुटूंब महिला शेतकरी गट, कुंभारगाव व अण्णपुर्ण महिला शेतकरी गट, सर्व सदस्य आणि दोन्ही गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन व आभार महेंद्र देशमुख यांनी मानले.








