चांदा येथे पशुपालकांना मका बियाण्याचे वाटप ; डॉ. पाटील खोसे यांच्याकडून शेतकऱ्यांना बियाणे वाटप व योग्य मार्गदर्शन
*चांदा येथे पशुपालकांना मका बियाण्याचे वाटप*
*डॉ. पाटील खोसे यांच्याकडून बियाणे वाटप व मार्गदर्शन*
*चांदा (प्रतिनिधी) :* पशुवैद्यकीय चिकित्सालय, चांदा येथे पशुपालक शेतकऱ्यांना मका बियाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील खोसे यांनी स्वतः पशुपालकांच्या हस्ते बियाणे वाटप करून पशुसंवर्धन व चारा व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
गुरांना पौष्टिक व सकस चारा मिळावा, दूध उत्पादनात वाढ व्हावी आणि पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, या उद्देशाने हे बियाणे वाटप करण्यात आले. मका हे जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक व पचायला हलके असे चारा पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मक्याची लागवड करून हिरवा चारा उपलब्ध करावा, असे आवाहन डॉ. खोसे यांनी यावेळी केले.
बियाणे वाटपावेळी पशुपालकांना मका पेरणीची योग्य वेळ, बियाण्याचे प्रमाण, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच चारा कापणी व साठवणूक याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच जनावरांचे आरोग्य, लसीकरण, जंत निर्मूलन आणि स्वच्छतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पशुपालकांनी बियाणे मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. चारा टंचाईच्या काळात हे बियाणे मोठा आधार ठरणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.








