क्रांतिसूर्य जननायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा अहिल्यानगर जिल्ह्याला विसर ; सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भूमिकेवर आदिवासी समाजाचे कार्यकर्ते बाबासाहेब शिंदें यांचा जळजळीत सवाल
क्रांतिसूर्य जननायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा आहिल्यानगर जिल्ह्याला विसर; राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर बाबासाहेब शिंदेंचा जळजळीत सवाल!
आदिवासी समाज केवळ निवडणुकीपुरताच आठवतो का?
महापुरुषांच्या सन्मानासाठी राजकीय नेतृत्व करणऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज

जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करणारे महान आदिवासी क्रांतिकारक, जननायक, क्रांतिसुर्य, धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांच्या उदासीनतेवर आदिवासी समाजाचे कार्यकर्ते बाबासाहेब शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आदिवासी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बिरसा मुंडा यांच्या जयंतीला जिल्ह्यात अपेक्षित सार्वजनिक महत्त्व आणि प्रसिद्धी मिळाली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भगवान बिरसा मुंडा यांनी अल्पवयातच ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित करून संघर्षाचे नेतृत्व केले. आदिवासींची अस्मिता, संस्कृती, परंपरा आणि हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. अशा महान क्रांतिकारकाच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींकडून सार्वजनिक अभिवादनाचे कार्यक्रम ठळकपणे दिसून आले नाहीत, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती केवळ सोशल मीडियावरील पोस्ट, छायाचित्रे आणि पुष्पहारांपुरती मर्यादित राहू नये. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, तरुणांना रोजगार, वनहक्कांची अंमलबजावणी, जमिनींचे संरक्षण आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी ठोस प्रयत्न होणे आवश्यक आहे. हीच भगवान बिरसा मुंडा यांना खरी आदरांजली ठरेल,फोटोपुरता सन्मान नको, विचारांची कृतीतून अंमलबजावणी व्हायला हवी ! असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात काही ठिकाणी जयंती साजरी झाली असेल आणि ती आपल्या निदर्शनास आली नसेल, तर संबंधित आयोजकांचे अभिनंदनच आहे. मात्र, जिल्हास्तरावर या जयंतीला अपेक्षित प्रसिद्धी आणि सामाजिक महत्त्व मिळाले नाही, ही वस्तुस्थिती चिंतन करायला लावणारी आहे.
आदिवासी समाजाला दयेची नव्हे, तर सन्मानाची गरज आहे. आश्वासनांची नव्हे, तर हक्कांच्या अंमलबजावणीची अपेक्षा आहे. भगवान बिरसा मुंडा यांचा सन्मान ही केवळ आदिवासी समाजाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची वैचारिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे राजकीय नेतृत्व लोकप्रतिनिधींनी या विषयावर आत्मपरीक्षण करावे, असे जळजळीत आवाहन बाबासाहेब शिंदे यांनी केले आहे.
■ निवडणुकीत मते हवीत, मग महापुरुषांच्या सन्मानाचा विसर का?
निवडणुका आल्या की प्रत्येक राजकीय पक्षाला सर्व समाजांची आठवण होते. समाजाच्या विकासाची आश्वासने दिली जातात; मात्र आदिवासी समाजाच्या महापुरुषांच्या सन्मानाचा विषय येतो, तेव्हा राजकीय नेतृत्वाची संवेदनशीलता कुठे जाते? आदिवासी समाज केवळ मतांसाठीच आहे का, असा परखड सवाल बाबासाहेब शिंदे यांनी उपस्थित केला आहे .
दुर्लक्षित घटकांचे प्रश्न आणि त्यांच्या महापुरुषांचे योगदान समाजासमोर मांडणे अपेक्षित आहे. मात्र, बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर विशेष लेख, अथवा विचारांना उजाळा देणारे लिखाण अपेक्षित प्रमाणात दिसून आले नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. आदिवासी समाजाचे प्रश्न आणि अस्मितेचे विषय प्रसारमाध्यमांनी गांभीर्याने मांडावेत, असे आवाहन आदिवासी कार्यकर्ते बाबासाहेब शिंदे यांनी केले आहे








