चांद्यात गोवंश कत्तलीचा संशयास्पद प्रकार उघड ; आठ जनावरांची सुटका

चांद्यात गोवंश कत्तलीचा संशयास्पद प्रकार उघड ; आठ जनावरांची सुटका

चांद्यात गोवंश कत्तलीचा संशयास्पद प्रकार उघड; आठ जनावरांची सुटका!

स्थानिक गुन्हे शाखेचा तीन ठिकाणी छापा; १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; संशयितांचा शोध सुरू

 

चांदा वार्ताहर : नेवासा तालुक्यातील चांदा येथे गोवंशीय जनावरांना कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवाईत उघडकीस आला आहे. गावातील खंडोबा मंदिर परिसरातील काटवन, पत्र्याच्या शेडचा आडोसा आणि चांदा-कुकाणा रस्त्यालगत अशा विविध ठिकाणी डांबून ठेवलेल्या आठ गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत सुमारे १ लाख १५ हजार रुपये किमतीची जनावरे ताब्यात घेण्यात आली असून, याप्रकरणी तिघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांचा छापा पडताच संबंधित संशयित घटनास्थळी मिळून आले नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील संशयितांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

गोपनीय माहितीने उघड केला प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये व पोलीसअंमलदारांचे पथक तयार करून अवैध धंद्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी हे पथक सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना चांदा गावात गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली. खंडोबा मंदिराजवळील काटवनात, पत्र्याच्या शेडच्या आडोशाला तसेच चांदा-कुकाणा रस्त्यालगत जनावरे ठेवल्याचे समजताच पथकाने तातडीने कारवाईची तयारी केली.

तीन ठिकाणी छापा; आठ जनावरांची सुटका मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी आठ गोवंशीय जनावरे डांबून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ जनावरांची सुटका करून त्यांना ताब्यात घेतले. या जनावरांची बाजारभावानुसार एकूण किंमत सुमारे १ लाख १५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या जनावरांची मालकी अयनाज मोबीन शेख, आशकान अमिन शेख आणि नबाब गुलाब शेख (तिघेही रा. चांदा, ता. नेवासा) यांच्याकडे असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. मात्र, छाप्याच्या वेळी हे तिघेही घटनास्थळी आढळून आले नाहीत.

कायद्याचा बडगा; सोनई पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८९/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) मधील कलम ५(अ), ५(ब), ९ आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत

अवैध गोवंश व्यवहारांवर नियंत्रणाचा प्रश्न ऐरणीवर

चांदा परिसरात विविध ठिकाणी जनावरे डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आल्याने गोवंशीय जनावरांच्या अवैध व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावाच्या वेगवेगळ्या ठिकाणी जनावरे ठेवली जात असतील, तर अशा हालचाली स्थानिक पातळीवर वेळीच लक्षात का आल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे आठ जनावरांची सुटका झाली असली, तरी या प्रकरणाचा तपास केवळ जनावरे ताब्यात घेण्यापुरता मर्यादित न राहता त्यांचा पुरवठा कुठून झाला, त्यांची वाहतूक कोणी केली, त्यामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का आणि प्रत्यक्ष कत्तलीचा काही कट होता का, या बाबींचाही तपास होणे आवश्यक आहे.

संशयितांचा शोध घेऊन संपूर्ण व्यवहाराची साखळी उघडकीस आणण्याबरोबरच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित गस्त आणि प्रभावी देखरेख आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईनंतर तपासातून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे चांद्यासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.