महात्मा फुले कृषी विद्यापीठात 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .

महात्मा फुले कृषी विद्यापीठात 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

*महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यामध्ये मोठे योगदान- प्रभारी कुलगुरु डॉ. साताप्पा खरबडे*

            महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रभारी कुलगुरु डॉ. साताप्पा खरबडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रभारी कुलगुरु डॉ. साताप्पा खरबडे म्हणाले की अकोला विद्यापीठात झालेल्या 52 व्या संयुक्त कृषि शिक्षण व संशोधन समितीच्या बैठकीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे 6 नविन वाण, 5 कृषि अवजारे व 92 तंत्रज्ञान शिफारशी प्रसारीत करुन उच्चांक केला आहे. विद्यापीठाने आत्तापर्यंत संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यामध्ये केलेल्या भरीव कामगिरीमुळे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने पुढील पाच वर्षांसाठी अधिस्विकृती देवून विद्यापीठाला उत्कृष्ठ ‘अ’ मानांकन देवून गौरविले आहे. नवी दिल्ली येथील भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाने (फिक्की) महात्मा फुले कृषि विद्यापीठास या वर्षाचा सर्वोत्कृष्ट विद्यापीठ-2024 या पुरस्काराने गौरविले आहे. शेतीच्या सिंचन पध्दतीसाठी सौर उर्जा उपयोगी ठरु शकते या विषयावर लक्ष केंद्रीत करुन जबलपूर येथील बिसा केंद्रामध्ये विद्यापीठाने 200 पेक्षा जास्त अधिकारी, विद्यार्थी व शेतकरी यांना सोलरवरील प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्याची संधी दिली आहे. विद्यापीठाने विविध विस्तार उपक्रमांच्या माध्यमातून कृषि तंत्रज्ञान लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यामध्ये विभागीय व जिल्हा विस्तार केंद्रे, कृषि विज्ञान केंद्रे यांच्या माध्यमातून गतवर्षी विविध विस्तार उपक्रम राबविण्यात आले. शेतकरी प्रथम प्रकल्पाद्वारे एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. कमी मनुष्यबळ असतांनादेखील विद्यापीठाने कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यामध्ये मोठे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले. 

             या कार्यक्रमाला विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संचालक संशोधन डॉ. विठ्ठल शिर्के, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड, कृषि तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंग चौहान, उपकुलसचिव (प्रशासन) श्री. विजय पाटील, सहाय्यक कुलसचिव (विद्या) श्रीमती स्वाती निकम, विविध विभागांचे विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी लेफ्टनंट डॉ. फुलसावंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण कार्यालय, पदव्युत्तर कृषि महाविद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा शल्य चिकित्सक, अहिल्यानगर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरासाठी विद्यापीठाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली हिले यांनी मदत केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्षनाथ शेटे यांनी केले.