*महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रथमच शिक्षण आढावा बैठक संपन्न.*

*महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रथमच शिक्षण आढावा बैठक संपन्न.*

*महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रथमच शिक्षण आढावा बैठक संपन्न*

*दहा जिल्ह्यातील सर्व शासकीय महाविद्यालयात विविध नाविन्यपर उपक्रम राबविणार*

*- कुलगुरु डॉ. विलास खर्चे*

*राहुरी विद्यापीठ, दि. 1 नोव्हेंबर, 2026*

 महाराष्ट्रातील बदलत्या हवामानाचे व दुष्काळाचे आव्हान पेलण्यासाठी 'वर्क फोर्स ऑन वॉटर' यासारखे नवीन उपक्रम सुरू करण्याची गरज आहे . नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला गती देण्यासाठी आवश्यक निविष्ठा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रत्येक महाविद्यालयात जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र उभारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकभिमुख ज्ञान मिळण्यासाठी प्रात्यक्षिक अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.

      महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच दोन दिवसीय शैक्षणिक आढाव बैठकीचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव श्री राजेंद्रकुमार पाटील,नियंत्रक डॉ. सचिनकुमार नांदगुडे उपस्थित होते.

      कुलगुरु डॉ. विलास खर्चे मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि शेतकरीहिताची जाणीव निर्माण करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘एक विद्यार्थी–एक झाड’ आणि ‘एक विद्यार्थी–एक शेतकरी’ हे विद्यार्थी केंद्रित उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

तसेच विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, जनजागृती व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी समुपदेशन व आरोग्य उपक्रम प्रत्येक महाविद्यालयात आयोजित केली जावीत. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाच्या ठिकाणी 'फुले कृषी माहिती आणि शेतकरी सन्मान कक्ष' स्थापन करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार व महिला शेतकऱ्यांशी संवाद वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात 'सावित्रीबाई फुले महिला शेतकरी-शास्त्रज्ञ मंच' स्थापन करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणातून प्राध्यापकांची क्षमता वृद्धिंगत करणार आहोत. महाविद्यालयामध्ये शिक्षण, संशोधन आणि विस्तार हे तिन्ही उपक्रम प्रभावीपणे राबवले जातील. कमवा आणि शिका योजनेतून विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग करून त्यांच्या कौशल्य व व्यक्तिमत्व विकासाला चालना दिली जाईल. फुले समृद्ध गाव उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि प्राध्यापक फुले समृद्ध गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करून कृषी व ग्रामीण विकासाचे विविध उपक्रम राबवीणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून फुले समृद्ध गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासोबतच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृषी तंत्रज्ञान देऊन मार्गदर्शन केले जाईल. विद्यापीठाचे मानांकन उंचवीण्यासाठी संशोधन लेख उच्च दर्जाच्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित करणे आणि बाह्य अर्थसहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठाचे उत्पन्न वाढवण्यासाठी विकास प्रकल्प राबवून महाविद्यालयांच्या जमिनींवर फळपिके लागवड करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात स्थानिक हवामानानुसार व स्थानिक गरजेनुसार एकात्मिक शेती पद्धतीचे घटक विकसित करण्यात येतील. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना विद्यापीठाचे तंत्रज्ञान बघण्यास व अनुभवण्यास मिळेल.शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद वाढण्यासाठी शेतकरी शास्त्रज्ञ मंच उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी सर्वांनी मिळून करावी असे आव्हान कुलगुरूंनी यावेळी केले. 

      याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. साताप्पा खरबडे म्हणाले की विद्यापीठाची शैक्षणिक प्रणाली आणि शैक्षणिक कामकाज अतिशय उत्तम प्रकारे स्थापित झाले असून सर्व प्राध्यापक, विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांचे योगदान यामध्ये मोलाचे ठरले आहे. कुलगुरू महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया, शेती विषयक नियोजन आणि इतर शैक्षणिक उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडत आहेत. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. गोरक्ष ससाणे म्हणाले की शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या माध्यमातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात येणार आहे. तसेच आत्ताच झालेल्या सेवा संकल्प अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल विद्यापीठाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. यावेळी महाविद्यालयांचे सर्व अधिष्ठातांनी त्यांच्या महाविद्यालयांचा उपक्रमाचा आढावा सादर केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व अधिष्ठाता, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रथमच सर्व घटक महाविद्यालयांच्या अधिष्ठातांना एकाच व्यासपीठावर आणणारी आणि शैक्षणिक कामकाजात समन्वय व एकसूत्रता निर्माण करणारी महत्त्वपूर्ण बैठक ठरली. महाविद्यालयांच्या शैक्षणिक कामकाजाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन, सामूहिक विचारमंथन आणि भविष्यातील विकासाची दिशा निश्चित करण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरली. या बैठकीतून निश्चित झालेल्या निर्णयांची कालबद्ध व परिणामकारक अंमलबजावणी करून कृषी शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबरोबरच संशोधन, विद्यार्थी विकास आणि शेतकरीसेवा या तिन्ही क्षेत्रांत विद्यापीठाला नवी गती मिळणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक शिक्षण डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ. रवि आंधळे यांनी मानले.