शेतकऱ्यांवर रासायनिक खत विक्रेत्या दुकानदारांची संक्रांत.

अहिल्यानगर जिल्हा// प्रतिनिधी
नेवासा तालुक्यात खत विक्रेत्या दुकानदारांनी खताची कृत्रिम टंचाई करून वाढीव दराने विक्री सुरू केली असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. युरिया बरोबर शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अनावश्यक असे इतर औषधे घेण्यास भाग पाडले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे . याबाबत कृषी विभागाकडून कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही ही मोठी शोकांतिका आहे .रासायनिक खत विक्रेत्या दुकानामध्ये अनेक वेळा खेटी मारून शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आलेला आहे .
अनेक संकटांनी वेढलेल्या बळीराजाला न्याय मिळेल का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.नवीन सरकारची स्थापना झाल्याच्या नंतर सदरचा प्रश्न सुटेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती परंतु हा प्रश्न काही सुटताना दिसुन येत नाही .विद्यमान आमदारांनी संबंधित गोष्टीची दखल घेऊन तातडीने शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे जातीने लक्ष घालावे व शेतकऱ्यांचा हा प्रश्न मिटवावा अशी मागणी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नाईलाजस्तव काही ठिकाणी शेतकऱ्यांना अक्षरशः पाचशे रुपयांना युरियाची गोणी घेण्याची वेळ आलेली आहे . शासनाने त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .