देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट..

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट..

पुणे, 2 जून 2025 – महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. श्री. माणिकराव कोकाटे यांनी आज कृषी महाविद्यालय, पुणे येथे कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. या भेटीचा उद्देश प्रकल्पामध्ये सुरू असलेल्या संशोधन व विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करणे हा होता.

भेटीदरम्यान कृषीमंत्र्यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या विविध प्रयोगांची, संशोधन प्रकल्पांची आणि इतर कामांची माहिती घेतली. भारतातील सर्वाधिक दूध देणाऱ्या देशी गायी तसेच महाराष्ट्रातील विविध देशी गायींची त्यांनी पाहणी केली. या गायींचे वैशिष्ट्य, दूध उत्पादनाची क्षमता आणि त्यांच्या संवर्धनासाठी सुरू असलेले प्रयत्न पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रकल्पामध्ये आयओटी (IoT) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून तयार करण्यात आलेल्या विविध ॲप्लिकेशन्सचीही माहिती कृषीमंत्र्यांना देण्यात आली. त्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे विशेष कौतुक केले आणि त्याचा उपयोग गायींच्या आरोग्य व्यवस्थापन, दुधाचे निरीक्षण आणि इतर विविध बाबींमध्ये कसा होतो याविषयी माहिती घेतली.

या भेटीवेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष श्री. तुषार पवार आणि प्रकल्पातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने उपस्थित होते. डॉ. माने यांनी संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती कृषीमंत्र्यांना दिली. देशी गाय प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवणे, तांत्रिक मार्गदर्शन करणे आणि देशी गायींचे महत्त्व पटवून देणे हे प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर भेटीदरम्यान प्रकल्पाचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे, सहशास्त्रज्ञ डॉ. संदीप पोळ, सहशास्त्रज्ञ डॉ. सुजित भालेराव, डेअरी मॅनेजर सौ. विद्या पिंपरकर तसेच सर्व कृषी सहाय्यक व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. 

कृषीमंत्र्यांनी देशी गाय प्रकल्पाचे कौतुक करतानाच, अशा प्रकल्पांद्वारे शेती व पशुपालन क्षेत्रात नवे मार्गदर्शन मिळेल आणि शाश्वत शेतीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

ही भेट देशी गायींच्या संवर्धनासाठी एक सकारात्मक पाऊल ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.