केशर डेअरी ते वरवंडी फाटा रस्त्याला वाली कोण? दुर्दशा झालेल्या रस्त्यावरून नागरिकांना करावा लागतोय प्रवास .

*केशर डेअरी ते वरवंडी फाटा रस्त्याला वाली कोण ?*
*रस्ता दुरुस्तीची नागरिकांची आणि वाहनधारकांची मागणी*
राहुरी तालुक्यातील केशर डेअरी ते वरवंडी चौक या रस्त्याची अतिशय दैनिय अवस्था झाल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहने कशी चालवावी असा प्रश्न पडला असून या रस्त्याला वाली कोण ? असा प्रश्न नागरिकांना वाहनधारकांना पडला आहे.
रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने वाहनधारकांना रस्ता सोडून दुसरीकडून मार्ग अवलंबलेला आहे आणि त्याच रस्त्याने येथील शेतकऱ्यांना वाहनधारकांना ये जा करावी लागत आहे. या रस्त्यावरून जाताना अनेक किरकोळ अपघात झाले आहेत . सध्या अवकाळीने कहरच केल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे यापैकी हा एक रस्ता आहे.येथील नागरिकांनी अनेक वेळा याबाबत तक्रारी केल्या मात्र संबंधित ग्रामपंचायत याची दखल घेत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे.
निवडणुकीच्या काळामध्ये अनेक पुढारी निवडून येण्यापुरते आश्वासने देतात मात्र निवडून आल्यानंतर ही आश्वासने आश्वासनेच राहतात. दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा हा रस्ता असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या बसेस व शेतकरी शेतमालाची वाहतूक करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने नागरिकांनी वाहनधारकांनी करायचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तरी संबंधित ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन या रस्त्याचे काम करावे अशी मागणी वरवंडी येथील नागरिकांनी केली आहे.