*महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व पाणी बचतीचे धडे शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट करण्याचे कृषी विद्यापीठाचे उद्दिष्टे*

*महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व पाणी बचतीचे धडे शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट करण्याचे कृषी विद्यापीठाचे उद्दिष्टे*

*महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व पाणी बचतीचे धडे*

*शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे कृषि विद्यापीठाचे उद्दिष्ट्य*

*- कुलगुरु डॉ. विलास खर्चे*

*राहुरी विद्यापीठ, दि. 27 नोव्हेंबर, 2026*

 राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण व ड्रोनचा वापर वाढवून शेती अधिक नफ्याची व शाश्वत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुष्काळ व बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा थेंब न थेंब कार्यक्षमतेने वापरणे, जमिनीतील ओलावा टिकवणे आणि सूक्ष्म सिंचन व सौरऊर्जेवरील पिव्होट सिंचन प्रणालीचा अवलंब करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेती न करता एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करावा तसेच प्रक्रिया व पूरक व्यवसायातून शेतकऱ्यांनी उद्योजक बनावे. नवीन वाण आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट्य विद्यापीठाने ठेवले असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले. 

 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीवर्षाचे औचित्य साधून आणि खेत बचाओ अभियानांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत हवामान अद्ययावत शेतीसाठी सौर ऊर्जेवर चालणारी मध्यवर्ती सिंचन पिवोट प्रणाली प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सेंट्रल पीव्हीट सिंचन प्रणालीसह प्रगत सिंचन प्रणाली व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय कृषि विकास योजनेचे प्रमुख अन्वेषक डॉ. महानंद माने व मानोरी येथील दीपस्तंभ शेतकरी गटाचे अध्यक्ष कृषिभुषण डॉ. दत्तात्रय वने उपस्थित होते.

 यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत बोडके म्हणाले की विद्यापीठाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन तंत्रज्ञान व काटकसरीने पाणी वापरण्याचे नियोजन यावर मार्गदर्शन दिले जात आहे. राज्याच्या धरणातील पाणीसाठा व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मोर क्रॉप, पर ड्रॉप या तत्त्वावर ठिबक व आधुनिक सिंचन प्रणालींद्वारे पिकांचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. महानंद माने म्हणाले की दुष्काळी परिस्थिती व पाण्याची टंचाई ही केवळ समस्या न मानता ती संधी मानून सिंचन व्यवस्थापन आणि जलसंवर्धन करण्यावर भर देणे गरजेचे आहे. ठिबक, तुषार, इनव्हर्टेड मायक्रो-स्प्रिंकलर, फर्टिगेशन, विविध फिल्टर्स आणि लॅटरल वायंडर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन सुमारे 40 टक्क्यांपर्यंत वाढवता येऊ शकते. यावेळी दत्तात्रय वने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार इंजि. निखिल दुगड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.