काटोल येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय द्यावे – माजी सभापती संजय डांगोरे यांची मागणी

1.

काटोल – बऱ्याच वर्षांपासून काटोल जिल्हा निर्माण व्हावा, यासाठी काटोल जिल्हा कृती समिती सातत्याने संघर्ष करत आहे. अलीकडेच या मागणीने जोर धरला होता. अशात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्याचआधारे काटोल पंचायत समितीचे माजी संभापती आणि काटोल जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष संजय डांगोरे यांनी काटोल येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय देण्यात यावे, अशी आग्रहाची मागणी पालकमंत्री बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

नागपूर जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत. यामध्ये नरखेड आणि काटोल तालुका जिल्हा केंद्रापासून काटोल 60 कि.मी. तर नरखेड 83 किलोमीटर चा अंतर आहे. त्यामुळे नागरिकांना जिल्ह्याच्या कामासाठी संपूर्ण दिवस खर्ची करावा लागतो. परिणामी नागरिकांचे अनेक कामं प्रलंबित राहतात. नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे काटोल जिल्हा निर्मितीचा अनेक दिवसांपासून प्रस्ताव प्रलंबित आहे. मात्र आता शासनाने काही ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा मानस दाखवला आहे. परंतू नेमकं कोणत्या ठिकाणी हे कार्यालय स्थापन होईल यात अजूनही निश्चितता नाही. त्यामुळे काटोल येथून सर्वप्रथम ही मागणी पुढे आली आहे. माजी सभापती संजय डांगोरे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय काटोल येथे सुरू करावे अशी मागणी केली आहे. जेणेकरून नरखेड आणि काटोल येथील नागरिकांना 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावरच सर्व प्रशासकिय सुविधा मिळेल. 

1972 पासून काटोल जिल्ह्याची मागणी

नागपूर जिल्हा 9 हजार चौरस हेक्टर क्षेत्रात विस्तारलेला आहे. जिल्ह्यात 13 तालुके असून शेवटच्या टोकावरील गावातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात पोहोचण्याकरता आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो. यातूनच 1972 पासून काटोल जिल्ह्याची मागणी पुढे आलेली आहे. काटोल जिल्हा व्हावा याकरता काटोल जिल्हा कृती समितीने धरणे आंदोलने, रास्ता रोको ,स्वाक्षरी अभियान, सभा, मोर्चे मोठ्या प्रमाणात या अगोदर काढलेले होते. शासनातर्फे सर्वेक्षण होऊनही 50 वर्षापासून ज्या काटोल जिल्ह्याची मागणी केली जात आहे. परंतु त्याकडे शासनाने दुर्लक्ष करून इतर छोटे जिल्हे महाराष्ट्र मध्ये मागणी नसतांनाही निर्माण केले. अनेकदा नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीत यामध्ये अनेकदा ठराव पास झालेले आहे, अशी माहिती काटोल जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष तथा माजी सभापती संजय डांगोरे यांनी दिली.