भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी संकल्प ! महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयात दक्षता व जनजागृती सप्ताह सुरू
*भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी संकल्प! महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयात 'दक्षता व जनजागृती सप्ताह' सुरू*

महाराष्ट्र शासनाकडून दि. 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर,2026 या दरम्यान दक्षता व जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पदव्युत्तर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांच्या नेतृत्वाखाली पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे दक्षता व जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विजयकुमार पाटील हे होते. यावेळी व्यासपीठावर पदव्युत्तर महाविद्यालयाचे तांत्रिक अधिकारी डॉ. चांगदेव वायाळ ,सहाय्यक कुलसचिव श्री.संजय पाटोळे , पदव्युत्तर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षणाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. बाबासाहेब भिंगारदे उपस्थित होते .
यावेळी डॉ. विजयकुमार पाटील विद्यार्थ्यांना दक्षता व जागृती सप्ताह निमित्त मार्गदर्शन करताना म्हणाले की भ्रष्टाचार हा एक देशाला लागलेला रोग आहे आणि प्रामाणिकपणा हे त्यावरचे औषध आहे. एका प्रामाणिक व्यक्तीने अख्खा समाज बदलू शकतो. त्यामुळे तुम्ही विद्यार्थी भविष्यात प्रामाणिकपणाने तुमचे कर्तव्य करावे.
मी लाच देणार नाही घेणारही नाही अशी आज आपण या ठिकाणी शपथ घेऊया. आपल्या कामात पारदर्शकता, प्रत्येक कामात प्रामाणिकपणा, वेळेवर आपले काम पूर्ण करणे, नियमांचे पालन करणे, कागदपत्रांमध्ये खरेपणा, जर कुठे चुकीचे घडत असेल तर आवाज उठवणे या गोष्टी जर तुम्ही अंगीकारल्या तर भ्रष्टाचार निश्चित कमी होईल.
यावेळी डॉ. बाबासाहेब भिंगारदे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी या सप्ताह निमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन केले आणि दक्षता व जनजागृती सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली. या सप्ताह निमित्त भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामावर प्रकाश टाकण्यासाठी वादविवाद स्पर्धा निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती या विषयाचे भित्तिपत्रे लावण्यात आली. या कार्यक्रमाची व्हाट्सअप व इतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








