श्री. नितिन वरखडे व श्री . स्वप्निल कणसे हे आहेत जून महिन्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आयडॉल्स .
*श्री. नितीन वरखडे व श्री. स्वप्निल कणसे हे आहेत जून महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स*
*राहुरी विद्यापीठ, दि. 1 जून, 2023*
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून मफुकृवि आयडॉल्स हा उपक्रम दोन वर्षापूर्वी सुरु झालेला आहे. जून महिन्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे शेतकरी आयडॉल म्हणुन श्री. नितीन वरखडे व कृषि उद्योजक आयडॉल म्हणुन श्री. स्वप्निल कणसे यांची निवड झालेली आहे. श्री. नितीन वरखडे हे मु. वरखडवाडी, पो. भोगाव, ता.वाई, जि. सातारा येथील शेतकरी असून कृषि पदवीधर श्री. स्वप्निल कणसे हे मु.पो. इंदापूर, जि. पुणे येथील कृषि उद्योजक आहेत.
शेतकरी आयडॉल श्री. नितीन वरखडे यांनी शेती निगडीत व्यवसायाबरोबर शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्यांनी राज्यातील रब्बी ज्वारी (फुले रेवती) पीक स्पर्धेत तृतीय क्रमांक तसेच कोल्हापूर विभागात भात (इंद्रायणी) पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला असून उसाचे एकरी 110 टन उत्पादन ते घेत आहेत. त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या जीवाणू खतांचा वापर शेतीमध्ये करुन इतर शेतकर्यांमध्ये त्याचा प्रसार केला आहे. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. तसेच कृषि उद्योजक श्री. स्वप्निल कणसे यांनी कोल्हापूर कृषि महाविद्यालयातुन बी.एस्सी. कृषिची पदवी घेतलेली आहे. त्याचबरोबर मार्केटींगमध्ये एम.बी.ए. केलेले आहे. त्यांनी सन 2019 साली सुरु केलेल्या लिबर्टी पोल्ट्री उद्योगाद्वारे 14 हजार पक्षांचे संगोपन केले आहे. त्याचप्रमाणे पोल्ट्री व्यवसायात योग्य मार्केटींग करुन विक्रीचे नियोजन केले आणि युवा उद्योजकांना पोल्ट्री उद्योग करण्यासाठी प्रवृत्त केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रदर्शीत करण्यात येतात.