आजारपणाच्या नैराश्येत तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
श्रीरामपूर शहरा नजीक असणाऱ्या टाकळीभान येथील एका 42 वर्षीय तरुणाने आजारपणाला कंटाळून नैराश्येपोटी राहाता तालुक्यातील धनगरवाडी शिवारात रेल्वे रुळावर आत्महत्या केली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी दिलेल्या अहवालावरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकळीभान या ठिकाणी राहत असणाऱ्या प्रसाद लक्ष्मण कदम (वय 42) या तरुणाने आजारपणाला कंटाळून नैराश्येपोटी राहाता तालुक्यातील धनगरवाडी शिवारात रेल्वेखाली जाऊन आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे. प्रसाद कदम हा तरुण जिल्हा परिषद शाळेचे निवृत्त शिक्षक लक्ष्मणराव कदम यांचा मुलगा होता. तो प्राथमिक शिक्षक बँकेत नोकरीस होता. त्याची पत्नीही रयत शिक्षण संस्थेत अध्यापिका आहे. तर लहान भाऊ अजित हा रयत शिक्षण संस्थेत सेवा करीत आहे. शुगरच्या आजारामुळे प्रसाद हा अत्यंत तणावाखाली असायचा. मंगळवारी सकाळी तो बँकेत जातो म्हणून तो घराबाहेर पडला तो घरी परतला नाही.कुटुंबाने त्याची रात्री शोधाशोध केली मात्र तो मिळून आला नाही. मंगळवारी रात्री 8 वाजता तालुका पोलीस ठाण्यात धनगरवाडी रेल्वे चौकीजवळ अज्ञात इसमाने रेल्वेखाली आत्महत्या केली असल्याची खबर आल्याने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक अडांगळे व गोपनिय विभागाचे अनिल शेंगाळे यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.रेल्वे रुळाच्या कडेलाच लावण्यात आलेल्या मोटारसायकलच्या नंबर वरून दुचाकी मालकाचे नाव शोधून अज्ञात मयताचा त्यांनी छडा लावला. बुधवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करून शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. काल दुपारी शोकाकूल वातावरणात प्रसाद याच्यावर टाकळीभान येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसाद याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजयी, पुतण्या असा परीवार आहे.