बोगस शिक्षक भरती संदर्भात आ. बच्चू कडूंच्या कारवाई आदेशाला केराची टोपली, आ. कडू स्वतःच येणार अॅक्शन मोडवर .
सन 2012नंतर नंतर शासनाने कोणतीही शिक्षक भरती संदर्भात जाहिरात दिली नसतानाही अहमदनगर जिल्ह्यातील अनेक संस्था चालक व माध्यमिक शिक्षण विभाग अहमदनगर येथील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून व शासनाची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण करून शिक्षक भरती केली कि काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे .
महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीसाठी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेमध्ये ही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले होते .यामध्ये बनावट सर्टिफिकेट मिळवलेल्या उमेदवारांना शिक्षक पद भरती मध्ये समाविष्ट करण्यात आले होते .हा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर शासनाने सुधारित पद्धतीने भरती करण्याचे काम सुरू केले आहे .
महत्त्वाचा विषय हा आहे की सन 2012 नंतर जे शिक्षक अवैधरित्या भरले गेले आहेत त्यांच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या असून सुद्धा या संस्थाचालकांवर व शिक्षण विभागातील पदाधिकाऱ्यांवर आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही . अहमदनगर जिल्ह्यातील समाजसेवक राम खाडे यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रधान सचिव,शिक्षण आयुक्त यांच्याकडे पुराव्यासहित तक्रार अर्ज दाखल केली आहे. नामदार बच्चू कडू यांनी नगर जिल्ह्यातील शिक्षण विभागात झालेल्या भ्रष्टाचारावर कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागाला कारवाई करण्याचे आदेशही दिलेले आहे तरीही आजपर्यंत या भ्रष्ट कारभारावर कुठलीही कारवाई झाल्याचे निदर्शनास आलेले नाही .त्यामुळे आमदार बच्चू कडू लवकरच ॲक्शन मोडवर येणार असल्याचे समजले आहे .ते काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
खरे पाहता आजच्या स्थितीला अनेक कार्यक्षम शिक्षक सध्या अतिशय तुटपुंज्या मानधनावर काही संस्थांवर कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत .त्यांची कार्यशैली पाहता त्यांना कायमस्वरूपी करण्याचे काम शासनाने प्राधान्याने केले पाहिजे होते परंतु संस्थाचालकांची मनमानी व शिक्षण विभागाचे पदाधिकारी यांनी पदाचा वापर करून केलेला भ्रष्टाचार यामुळे चांगल्या शिक्षकांना आज घरी बसावे लागले आहे किंवा कमी पगारावर कंत्राटी पद्धतीने काम करावे लागत आहे .ज्या संस्थांवर कंत्राटी पद्धतीने खरोखर जे शिक्षक चांगलं काम करत आहे त्यांची दखल शासनाने घेऊन त्यांना त्याच शाळेवर कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावे अशी मागणी त्या शिक्षकांकडून होत आहे .
शासनाची फसवणूक करून स्वतःच्या तिजोऱ्या फुल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व शैक्षणिक संस्थांवर चौकशी नेमून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे .तक्रारदारांच्या तक्रारीमुळे बोगस नियुक्त झालेल्या शिक्षकांचे धाबे चांगलेच दणाणले असल्याचे सध्या दिसत आहे .या बोगस शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट असणारे वरिष्ठ सहाय्यक हे प्रकरण लवकर निपटावे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत असल्याचे समजले आहे .या बोगस शिक्षक भरती विषयी शासनाने त्वरित पाऊल उचलून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करून शासनाने आपली सिद्धता जनतेसमोर सिद्ध करावी अशी मागणी तक्रारदार व नागरिकांकडून होत आहे .