घाणीचे साम्राज्य व तुंबलेल्या नालीतील दुर्गंधीने राहुरी खुर्द येथील नागरिक त्रस्त, जनतेचे आरोग्य धोक्यात .

घाणीचे साम्राज्य व तुंबलेल्या नालीतील दुर्गंधीने राहुरी खुर्द येथील नागरिक त्रस्त, जनतेचे आरोग्य धोक्यात .

                राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे सात देवी मंदिराच्या समोर नगर मनमाड हायवेच्या रस्त्यालगत उघड्या नालीचे बांधकाम करण्यात आले आहे .या नालीतून सांडपाणी वाहून जाण्यासाठी याचा उपयोग होतो .या नालीची स्वच्छता न झाल्यामुळे नालीमध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढून सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे .

       सात देवी मंदिराच्या काही अंतरावर रस्त्याच्या बाजूला विद्युत ट्रान्सफर बसवण्यात आले आहे .या विद्युत ट्रान्सफर च्या अवतीभोवती कचऱ्याचा ढिग जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे तसेच नालीतील सांडपाण्याच्या दुर्गंधीने स्थानिक नागरिकांना व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे .

        या कचऱ्यामुळे व तुंबलेल्या नाली मुळे या पाण्यामध्ये जंताचे प्रमाण वाढले आहे तसेच डासांचेही प्रमाण वाढले आहे .यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे . या नालीच्या कडेला काही व्यावसायिकांचे दुकानं आहेत .उघड्या नालीतील दुर्गंधीमुळे नागरिक दुकानांमध्ये येण्याचे टाळतात त्यामुळे या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे .

             गेल्या अनेक दिवसापासून या प्रलंबित प्रश्नांकडे राहुरी खुर्द मधील सरपंच व ग्रामसेवक यांनी का लक्ष घातले नाही असा सवाल नागरिक करत आहेत .आतातरी स्थानिक प्रशासनाने या घाणीचे साम्राज्य व तुंबलेली नाली स्वच्छ करून ती बंदिस्त करावी व होणाऱ्या त्रासापासून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी राहुरी खुर्द येथील ग्रामस्थ करीत आहेत .