ताहाराबाद शिवारात गंगाधर काकडेंवर तीघा अज्ञातांनी केला हल्ला राहुरी पोलिसात गुन्हा दाखल.

ताहाराबाद शिवारात गंगाधर काकडेंवर तीघा अज्ञातांनी केला हल्ला राहुरी पोलिसात गुन्हा दाखल.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ताहाराबाद शिवारात असलेल्या महिपती पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून जात असताना तीन जणांनी कॉम्रेड गंगाधर काकडे यांच्यावर हल्ला करून बेदम मारहाण केली. सदरील घटना शुक्रवारी (दि.१९) दुपारी साडेचारच्या सुमारास ताहाराबाद शिवारात घडली आहे. 

गंगाधर रघुनाथ काकडे (वय 52, मु. पो. शेरी चिखलठाण, हल्ली रा. ताहाराबाद-गाडकवाडी शिवार, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दि. 19 जानेवारी 2024 रोजी दुपारी 4:20 वाजेच्या सुमारास मी दुचाकीमध्ये (एमएच. 17, एएल 7517) पेट्रोल भरण्यासाठी चिंचाळे फाट्यावरील पालवे हिंदुस्तान पेट्रोलपंपावर गेलो. तेथे गर्दी असल्याने पेट्रोल भरण्यासाठी लाईनमध्ये उभा राहिलो. याचदरम्यान, दुचाकीवर ट्रिपल शीट तीन अनोळखी व्यक्ती आले. ते पेट्रोल भरण्यासाठी लाईनमध्ये उभे न रहाता मध्येच घुसून पुढे गेले. यावेळी मी त्यांना लाइन तोडुन पुढे का गेले, अशी विचारणा केली. याचाच राग मनात धरून त्यांनी शिवीगाळ करुन दमदाटी केली.

दरम्यान, मी तेथे दुचाकीमध्ये पेट्रोल न भरता तेथुन निघुन गेलो व चिंचाळे फाट्यापासून सुमारे पाचशे मिटर अंतरावरील महिपती महाराज पेट्रोल पंपावर पेट्रोल भरुन घरी जाण्यासाठी निघालो. तेव्हा ताहाराबाद गावाच्या शिवारात राहुरी ते म्हैसगाव डांबरी रस्त्यावर पालवे यांच्या पेट्रोलपंपावर शिवीगाळ केलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी माझी दुचाकी आडवली व शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी डोक्यात, कानावर जोरजोरात मारहाण केली. त्यावेळी मारहाणीत माझ्या डोळ्याचा चष्मा खाली पडला. तसेच या झटापटीत खिशातील पाच हजार रुपये पडुन गहाळ झाले. तर सदरील व्यक्तींनी माझा उजवा हात पिरगाळुन बोटातील सोन्याची अंगठी काढून घेतली.

यावेळी त्यांच्या तावडीतुन सुटून मी कसाबसा घरी गेली आणि पत्नी, भाऊ डॉ. सुभाष काकडे व इतर नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला.

त्यानुसार गंगाधर रघुनाथ काकडे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गु.र.न. ५५/२०२४ नुसार भादंवी ३९४, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील करीत आहे.

चौकट

पोलिसांनी गुन्हेगारांना जेरबंद करावे : काकडे

मी शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षापासून महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करीत आहे. यापूर्वीही महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांना अशा घटनांना सामोरे जावे लागले आहे तर काहींना गोळ्या घातल्या आहेत. त्यामुळे माझ्यावर झालेला भ्याड हल्ला कोणत्या उद्देशाने झाला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही, त्यामुळे पोलिसांनी त्वरित गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांची कसून चौकशी करावी.