स्त्री आणि धर्माविषयाची दृष्टी समतेची ठेवण्याची छत्रपती शिवरायांची शिकवण - जेष्ठ साहित्यिक डॉ . श्रीपाल सबनीस .
स्त्रीयांबद्दलचा आदर भाव, कमालीची नैतिकता व धर्मातीत राजकारण या गोष्टी आजच्या काळासाठी फार गरजेच्या व महत्वाच्या आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः त्याबद्दल एक आदर्श घालून दिला आहे. शिवरायांनी नेहमी स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली. तसेच त्यांचे राजकारण हे नेहमी धर्माच्या पलीकडचे राहील अशा प्रकारची स्त्री व धर्माविषयीची समतेची दृष्टी ठेवण्याची शिकवण छत्रपती शिवरायांची होती असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय, पदव्युत्तर कृषी महाविद्यालय व डॉ अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष व सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कुलगुरूंचे विशेष कार्य अधिकारी तथा आंतरविद्याशाखा जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान, जीव रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनिल काळे, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अण्णासाहेब नवले, कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे, सौ.सबनीस, विद्यापीठ क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, सहाय्यक कुलसचिव श्री. वैभव बारटक्के उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस आपल्या भाषणात म्हणाले की शिवाजी महाराज सर्व जाती-धर्मांना समतेची वागणूक देत होते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होती. सर्वांचा विकास हाच त्यांच्या राज्यातील लोकशाहीचा गाभा होता. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शेतकरी सुद्धा तेवढाच समाधानी होता. शेतकऱ्यांच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा काळजी घेणारे जगातील एकमेव राजे शिवाजी महाराज असल्याचे गौरवउद्वगार डाॅ. सबनीस यांनी यावेळी काढले.आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. सी. एस. पाटील म्हणाले की आजच्या आधुनिक युगातही शिवाजी महाराजांचे विचार मार्गदर्शक आहेत . आपली कितीही भौतिक प्रगती झाली असेल तरीही शिवाजी महाराजांचे विचार आपल्या कृतीतून दिसायला हवेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतांना त्यांचे पावित्र्य जपण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक,स्वागत व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. महावीर सिंग चौहान यांनी करून दिली.
याप्रसंगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कुमारी स्वाती वर्पे व नीरज पठारे या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांविषयीचे आपले विचार व्यक्त केले. डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ४० विद्यार्थ्यांनी शिवनेरी येथून १५० कि.मी. अंतरावून आणलेल्या शिवज्योतीची विद्यापीठ परिसरातून भव्य अशी मिरवणूक काढली. याप्रसंगी शिवनेरी येथून शिवज्योत आणणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित नाटिका सदर केली. डॉ. विलास आवारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृतिका बुरांगे हिने केले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी तसेच पदव्युत्तर महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.