म.फु.कृ.विद्यापीठ राहुरी येथे मुख्य प्रवेश द्वारावर उर्वरीत प्रकल्पग्रस्तांच्या नोकर भरती करणे बाबत आमरण उपोषण सुरू.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी च्या स्थापनेला 56 वर्ष पूर्ण झाली आहे. विद्यापीठ स्थापनेवेळी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या अशा प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबातील एका सदस्यास विद्यापीठांमध्ये नोकरीवर सामावून घेण्याची तरतूद आहे. जवळपास 584 शेतकऱ्यांच्या 2598.69 हेक्टर जमिनी विद्यापीठासाठी संपादित करण्यात आल्या. विद्यापीठ स्थापनेपासून आत्तापर्यंत वेळोवेळी 352 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विद्यापीठ सेवेमध्ये सामावून घेण्यात आले. उर्वरित प्रकल्पग्रस्तांनी वेळोवेळी विद्यापीठ सेवेत समावून घेण्यासाठी आंदोलने व उपोषणे केली. विद्यापीठ स्तरावर व शासन स्तरावर प्रकल्पग्रस्त कृती समितीने पाठपुरावा देखील केला परंतु शासनाने अजून पर्यंत प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठ सेवेत सामावून घेण्यासाठी विद्यापीठांना
आदेशित केलेले नाही. सद्यस्थितीत विद्यापीठांमध्ये वर्ग 3 व वर्ग 4 पदाच्या 1600 पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. उर्वरित प्रकल्पग्रस्तांपैकी काही प्रकल्पग्रस्त शेतकरी वयाच्या मर्यादेतून बाद होण्याची वेळ आली आहे. पुनर्वसन अधिकारी अहमदनगर यांनी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणे व हस्तांतरित करणे बंद केलेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी विद्यापीठासाठी जमिनी दिल्या त्यांचे शासनाकडून कुठल्याही प्रकारचे पुनर्वसन न करता फसवणूक केली गेली आहे. काही दिवसांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांनी प्रकल्पग्रस्त भरती बाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून प्रकल्पग्रस्त भरती बाबत विद्यापीठांना आदेशित करणे आवश्यक आहे. जेणेकरून उर्वरित प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर विद्यापीठ सेवेमध्ये सामावून घेता येईल. मा. कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील, म. फु. कृ.वि, राहुरी,कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, संचालक संशोधन डॉ. विठ्ठल शिर्के, संचालक
विस्तार शिक्षण, डॉ. गोरक्ष ससाणे,कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. कोळसे, उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम व सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्षनाथ शेटे यांनी वेळोवेळी प्रकल्पग्रस्त भरती बाबत सकारात्मक भूमिका घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा केला. प्रकल्पग्रस्त भरती बाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करून विद्यापीठांना भरती बाबत आदेशित करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील उर्वरित प्रकल्पग्रस्त दिनांक 3 ऑक्टोबर 2024 पासून विद्यापीठाच्या गेट समोर अन्नत्याग उपोषणास बसले आहेत अशी माहिती प्रकल्पग्रस्त कृती समिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे अध्यक्ष श्री संतोष पानसंबळ, उपाध्यक्ष श्री विजय शेडगे व सचिव श्री सम्राट लांडगे यांनी दिली.