दत्तक मुलिशी गैरवर्तन करणाऱ्या सावत्र नराधम बापास सक्तमजुरी व दंडाची शिक्षा.
अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे राहणा-या आरोपी नामे संतोष अशोक माळी याने त्याच्या पत्नीने घेतलेल्या दत्तक मुलीशी गैरवर्तन केल्या प्रकरणी मा. विशेष जिल्हा न्यायाधीश, श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी आरोपीस भा.द.वि. कलम ३५४ अ, ५०६ अन्वये दोषी धरून आरोपीस भा.द.वि. कलम ३५४ अ नुसार २ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रू. ३०००/- दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच भा.द.वि. कलम ५०६ नुसार ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रु. ३०००/- दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. **या प्रकरणी सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील श्रीमती मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले.*
सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी की,
दिनांक २२.११.२०२२ रोजी पिडीत अल्पवयीन मुलगी हिने तिच्या सावत्र वडिलांविरूध्द पारनेर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की, आरोपी हा तिचा सावत्र वडिल असून तो तिच्याकडे वाईट नजरेने पाहायचा. तसेच रात्रीच्या वेळी तिच्या सोबत अश्लील कृत्य करीत होता. याबाबत पिडीतेच्या आईने आरोपीस समजावून सांगितले असता आरोपी तिला म्हणाला कि, पिडीत ही तुझी मुलगी नाही व माझीही मुलगी नाही. यावर पिडीतेच्या आईने विरोध केला असता आरोपीने पिडीतेला व तिच्या आईला जिवंत मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच वाईट शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केलेली होती. याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादी वरून पारनेर पोलीसांनी आरोपी संतोष अशोक माळी याचेविरूध्द भा.द.वि. कलम ३७६ (२), (फ) ३५४ (अ) ३२३,५०४, ५०६ तसेच पोक्सो कायदा कलम ४,५ (एन), ८ व १२ नुसार गुन्हा दाखल केला. सदर घटनेचा तपास पो. उपनिरीक्षक शैलेंद्र जावळे यांनी करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण ८ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी तसेच पिडीत मुलीची आई, पंच साक्षीदार, वैदयकिय अधिकारी, तपासी अधिकारी, तसेच वया संदर्भात अहमदनगर महानगरपालिकेचे माहितगार इसम यांची साक्ष नोंदविण्यात आली. या केसची सुनावणी चालु असताना सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की, आरोपी हा पिडीत मुलीचा नात्याने सावत्र वडील लागतो. समाजामध्ये आजची परिस्थिती पाहता लहानग्या कोवळया मुलींवर तिच्या राहत्या घरांमध्येच अत्याचार होतो. मुलगी ही घटनेच्या वेळी केवळ १५ वर्षांची होती. अशा कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होत असतो व त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांचे मनावर पडतात. आरोपीने अत्यंत वाईट पध्दतीने सदरची घटना केलेली आहे. त्यामुळे आरोपीला जर या केसमध्ये निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून लहानग्या अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा-पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वय वर्षे १५ असलेली अज्ञान मुलगी ही आरोपी विरूध्द काहीही कारण नसताना खोटे का सांगेल? त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी. सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राहय धरून मा. न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील श्रीमती मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म.पो.कॉ. अडसुळ, तसेच स. फौ. शिवनाथ बडे यांनी सहकार्य केले.