जगद्गुरू संत तुकोबारायांचे सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज पुण्यतिथीनिमित्त मोकसबाग ( कांदळी ) ते श्री क्षेत्र ओतूर येथे एक दिवसीय सद्गुरु भेट पायी पालखी सोहळ्याचे आयोजन .
भगवान शिव अवतार चिदंबर महास्वामी कृपेने चिदंबर स्वरूप उमाकांतभाऊ कुलकर्णी यांच्या प्रेरणेने व आदरणीय प .पु .ताईंच्या मार्गदर्शना नुसार संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वैशाख वद्य द्वादशीच्या मुहूर्तावर सद्गुरू भेट पायी दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ह.भ.प. रामदास मोरे यांनी दिली आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांची दि.२७ मे रोजी पुण्यतिथी आहे .चिदंबर स्वरूप सद्गुरु उमाकांत भाऊ कुलकर्णी यांनी ॥भोजना मागती तूप पावशेर॥पडिला विसर स्वप्ना माजी ॥ ही स्वप्नपूर्ती पूर्ण व्हावी आणि शिष्य गुरु भेट व्हावी या उद्देशाने हा पायी दिंडी सोहळा सुरू केला होता . सर्व चिदंबर भाविक गुरु आज्ञेचे पालन करीत दरवर्षी टाळांच्या गजरात अभंग , गौळणी गात व पावले खेळत हा पालखी सोहळा पूर्ण करत असतात .
त्याचप्रमाणे याहि वर्षी दि. २७ मे रोजी शुक्रवारी सकाळी ८ वाजता कांदळी येथून पालखी भक्तिमय वातावरणात निघणार असून सायंकाळी ६ वाजता ओतूर या ठिकाणी जाणार आहे .यानिमित्ताने सायंकाळी ७ ते ९ वाजता ह.भ.प. डॉ.विकासानंद मिसाळ यांचे हरी किर्तन आयोजित करण्यात आले आहे .या पायी दिंडी सोहळ्यात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन चिदंबर सेवा समिती मोकसबाग कांदळी यांच्या वतीने करण्यात आले आहे .