शेवगाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्र दि . 03/07/2024 पासून बेमुदत बंद,खतांसोबत येणाऱ्या लिंकिंग मटेरियलमुळे दुकानदार त्रस्त .
शेवगाव तालुक्यातील रासायनिक खतांची विक्री करणारे दुकानदार सध्या ॲक्शन मोडमध्ये आले आहे .कृषी सेवा दुकानदारांना खतासोबत घ्यावे लागत असलेल्या लिंकिंग मटेरियलमुळे कृषी सेवा केंद्र चालक सध्या त्रस्त असून आता शासकीय स्तरावरूनच या पद्धतीचा सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी शेवगाव तालुका रासायनिक खते व्यापारी संघटनेच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .शेवगाव तालुक्यात एकूण 170 नोंदणीकृत कृषी सेवा केंद्र आहे .या सर्व दुकानदारांना कंपनीने रासायनिक खतांसोबत दिलेली लिंकिंग मटेरियल धुळखात पडून आहेत .प्रत्येक दुकानदाराकडे सरासरी दोन ते तीन लाखांचे लिंकिंग मटेरियल पडून असल्याने शेवगाव तालुक्यात दोन कोटींपेक्षा जास्त लिंकिंग मटेरियल शिल्लक आहे . या सर्व दुकानदारांनी कंपनीकडे तक्रार केली असता कंपनीकडून फक्त खत पुरवले जाते लिंकिंग मटेरियल दिले जात नाही असे सांगून कंपन्यांनीही हात वर केले आहे .जर कंपनी दुकानदारांना खत पुरवत असेल तर या खताबरोबर लिंकिंग मटेरियल कोण पुरवतो आणि याला जबाबदार कोण आहे ?असा प्रश्न निर्माण होत आहे .
तीन महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या समवेत सर्व कंपनींच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या मीटिंगमध्ये लिंकिंग करून खतपुरवठा करू नये असे सांगण्यात येऊन सुद्धा कंपन्यांनी व होलसेलर यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले .किरकोळ दुकानदारांकडे खतासोबत आलेल्या या लिंकिंग मटेरियलमुळे दुकानदार व शेतकरी यांच्यात वाद निर्माण होत असल्याने याबाबत निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही .
शासनाचा आदेश आहे की,खतासोबत लिंकिंग मटेरियल देऊ नये तसेच शासनाच्या खताला सबसिडी आहे मग त्यासोबत लिंकिंग मटेरियल देण्याचे कारण काय, कंपनी व होलसेलर नको असलेल्या उत्पादनांसोबत लिंकिंग मटेरियल का देतात आणि शासनाच्या खताला सबसिडी असल्याने नेमकंं या सबसिडीचा मलिदा कोण खातो ? हा सर्वात मोठा गंभिर प्रश्न उपस्थित होत आहे.शेतकऱ्यांना लिंकिंग मटेरियल दिले तर दुकानदार व शेतकरी यांच्यामध्ये भांडणं होतात व त्याचा परिणाम या दुकानदार व्यवसायांना भोगाव लागतो .शेतकऱ्यांनाही खताबरोबर लिंकिंग मटेरियल घ्यावे लागत असल्यामुळे त्यांचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते व नको असलेले मटेरियल खतासोबत घ्यावे लागते .शेतकरी संघटनेने दुकानदारांना दोषी न ठरवता या लिंकिंग मटेरियल बाबत शासनाला धारेवर धरावे असे व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे .
यापुढे शासनाने हा निर्णय संपवावा अन्यथा आम्हाला मुबलक व विना लिंकिंग खतांचा पुरवठा करावा अशी विनंती करण्यात येत आहे .तसे न झाल्यास शेवगाव तालुका रासायनिक खते व्यापारी संघटनेच्या वतीने जोपर्यंत रासायनिक खत लिंकिंग बंद करत नाही तोपर्यंत शेवगाव तालुक्यातील दुकाने दिनांक 30 जुलै 2024 पासून बेमुदत बंद राहतील असे व्यापारी संघटनेच्या वतीने शेवगाव तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .