महात्मा फुले कृषी विद्यापीठात तणावमुक्त जीवनशैली जगण्याची कला या विषयावर व्याख्यान संपन्न, मनस्थिती बदलली तर परिस्थिती बदलेल - कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील
*महात्मा फुले कृषि विद्यापीठात तणावमुक्त जीवनशैली जगण्याची कला या विषयावर व्याख्यान संपन्न*
*मनस्थिती बदलली तर परिस्थिती बदलेल*
*- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील*
आज प्रत्येकजण तणावपुर्ण परिस्थितीमध्ये आपले जीवन जगत आहे. परंतु, आपण आपली जीवनशैली सुरुवातीपासूनच चांगली ठेवली तर आपले जीवन सूसह्य होईल. ताणतणावात जगायचे की ताणविरहीत जगायचे हे आपल्या मनाच्या परिस्थितीवर अवलंबून असून आपण जर मनस्थिती बदलली तर परिस्थिती बदलेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान, शिक्षण प्रभाग, ब्रम्हाकुमारीज, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने तणावमुक्त जीवनशैली जगण्याची कला या विषयावर डॉ. नानासाहेब पवार सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन नाशिक येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे समुपदेशक आणि मनोविकार सल्लागार प्रा. विकास साळुंखे उपस्थित होते. याप्रसंगी संचालक संशोधन डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके व राहुरी येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्याविद्यालयाच्या संचालीका बीके. नंदा दिदी उपस्थित होत्या.
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील पुढे म्हणाले की आपली संगत कुणाशी आहे याच्यावर आपले जीवन यशस्वी किंवा बाद हे ठरते. सत्कर्म हाच खरा धर्म असून जो सर्वांचा विचार करतो त्याचा सर्वजण विचार करतात. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते प्रा. विकास साळुंखे तणावमुक्त जीवनशैली जगण्याची कला या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नविन काहितरी घेऊन येत असतो. जे घडून गेले त्या गोष्टीला विसरुन जा. प्रत्येक वेळी स्वतःची तुलना दुसर्याशी करु नका. येथे प्रत्येकजण वेगळा आहे. नेहमी दुसर्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा. जेवढी शक्य होईल तेवढी दुसर्याला मदत करा. येईल ती परिस्थिती स्वीकारा, स्वतःला बदला व सामोरे जा. नविन बदल आत्मसात करायला शिका. आपल्या जीवनात अडचणी तसचे विविध गुंतागुंतीचे प्रश्न येतच राहणार आहे. त्यासाठी तुम्ही स्वतः त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मजबुत बना. सकारात्मकता, नाविन्यता हाच जीवन यशस्वी करण्याचा राजमार्ग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंग चौहान यांनी संविधान दिनाबद्दल माहिती देवून संविधान दिनाची शपथ उपस्थितांना दिली. यावेळी कुमारी तेजस्वीनी भद्रे या विद्यार्थीनीने संविधानाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी तर आभार प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, राहुरी येथील ब्रम्हाकुमारी केंद्राच्या बीके. उषा दिदी, बीके. खुशी दिदी, बीके. पंकजभाई, बीके. महेशभाई, बीके अनिलभाई, पदव्युत्तर महाविद्यालयाचे तसेच कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.