सौरऊर्जा सिंचन प्रणाली शेतीसाठी भविष्यातील गरज - आमदार प्राजक्त तनपुरे
*सौरऊर्जा सिंचन प्रणाली शेतीसाठी भविष्यातील गरज*
*- मा.आ. श्री. प्राजक्तदादा तनपुरे*
*राहुरी विद्यापीठ, दि. 27 ऑगस्ट,2024*
भविष्यामध्ये शेतीतील सिंचनासाठी सौर ऊर्जा ही महत्त्वाची ठरणार आहे त्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकार पाऊल उचलत आहेत. सौर ऊर्जेच्या माध्यमातून सिंचन प्रणालीसाठी शेतकर्यांचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सौरऊर्जा सिंचन प्रणाली या विषयावर शेतकर्यांसाठी व विद्यापीठ कर्मचार्यांसाठी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे बोरलॉग इन्स्टिट्यूट फॉर साउथ एशिया (बिसा) संस्थेमध्ये तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ करत असलेले प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहेत. येणार्या भविष्यात सौर ऊर्जा सिंचन प्रणाली शेतीसाठी भविष्यातील गरज ठरणार असल्याचे प्रतिपादन मा. आ.श्री. प्राजक्तदादा तनपुरे यांनी केले. विद्यापीठातील कर्मचारी व शेतकरी यांचा समावेश असलेल्या तुकडीला प्रशिक्षणासाठी निरोप देताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत असताना मा. आ. श्री. प्राजक्तदादा तनपुरे बोलत होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांचे सूचनेनुसार व संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील कर्मचारी आणि शेतकरी यांच्यासाठी सदरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कर्मचारी आणि शेतकर्यांसाठी सौर ऊर्जा सिंचन योजना या विषयावर तीन दिवसांच्या क्षमता विकास प्रशिक्षणासाठी जबलपूर, मध्य प्रदेश येथे बोरलॉग इन्स्टिट्यूट फॉर साउथ एशिया (बिसा) या संस्थेत 34 कर्मचारी आणि 14 शेतकरी असे एकूण 48 प्रशिक्षणार्थींची पाचवी तुकडी रवाना झाली. यावेळी इंडियन डेअरी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अरुण पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. कृषि अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. मुकुंद शिंदे आणि काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सेलन्सचे सहप्रमुख संशोधक डॉ. सुनील कदम यांनी प्रशिक्षणा संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी तर आभार कृषीविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. रवी आंधळे यांनी मानले.