*आरोग्य आणि उत्पन्न दोन्ही देणारे नाचणी पीक घ्यावे विस्तार शिक्षण.*
*राहुरी विद्यापीठ, दि. 12 जून, 2026*
नाचणी या पिकाचा आपण राहुरी तालुक्यात प्रथमच अंतर्भाव करत आहोत. हे पीक उन्हाळी आणि खरीप हंगामात घेता येते. राहुरी तालुक्यात उन्हाळ्यात घेतलेल्या प्रात्यक्षिकात हे निदर्शनास आले आहे की एकरी 18 क्विंटलपर्यंत ते उत्पादन देते. कपाशी आणि कांद्याला या भागात हे पीक पर्यायी पीक होऊ शकते. हे पीक पौष्टिक तृणधान्यांमध्ये येत असल्याने आपल्या आरोग्यास हितकारक आहे. नाचणी हे पीक चांगले उत्पादन, उत्पन्न देणारे आणि आरोग्यवर्धक असल्याने शेतकर्यांनी याकडे वळावे असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खेती बचाव अभियानांतर्गत राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत शेतकर्यांच्या शाश्वत विकासासाठी भरडधान्यांचे उत्पादन आणि काढणीनंतरची मूल्य साखळी या प्रकल्पांतर्गत शिवार फेरी व नाचणी पीक प्रात्यक्षिके या कार्यक्रमाचे आयोजन राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे करण्यात आले होते. यावेळी संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. सुधाकर बोराळे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मृद व कृषि रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके, प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक आणि कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, श्रीरामपूरचे उपविभागीय कृषि अधिकारी श्री. प्रवीण गोसावी, कोल्हापूर येथील अखिल भारतीय समन्वयित नाचणी व पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. योगेश बन, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. सचिन सदाफळ, महाबीज जिल्हा व्यवस्थापक श्री. सुनील दौंड, राहुरी कारखान्याचे संचालक श्री. सुनील मोरे, प्रगतशील शेतकरी डॉ. दत्तात्रय वने व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी श्री. सुधाकर बोराळे मार्गदर्शन करताना म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नाचणी पीक येणार्या काळात वरदान ठरणार आहे. शेतकर्यांनी पारंपारिक पिके सोडून आता पीक विविधीकरण संकल्पनेकडे जाणे गरजेचे आहे. जगाला लागणारे 60 टक्के पौष्टिक तृणधान्य आपण निर्यात करतो. नागलीच्या मूल्यवर्धनासाठी पी.एम.एफ.इ. योजनेअंतर्गत विविध सवलती उपलब्ध आहेत. परदेशात विषमुक्त अन्नासाठी जास्त भर दिला जातो. आपल्याला विषमुक्त अन्नासाठी पौष्टिक तृण धान्याकडे वळणे गरजेचे आहे असल्याचे म्हणाले.
यावेळी संतुलित खत वापर व्यवस्थापन या विषयावर डॉ. भीमराव कांबळे, नाचणीचे आहारातील महत्त्व या विषयावर डॉ. सुरेश दोडके, नाचणीची लागवड पद्धत या विषयावर डॉ. योगेश बन, खरीप हंगामासाठी बियाणे या विषयावर श्री. सुनील दौंड यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अन्वेषक डॉ. पंडित खर्डे यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाची माहिती देऊन त्याची उद्दिष्टे सांगितली. या कार्यक्रमादरम्यान आरडगाव येथील श्री. भास्कर पंडित, श्री. कुणाल पवार, श्री. जालिंदर काळे आणि श्री. सुनील मोरे यांनी नाचणी पीक लागवडीबद्दल आपले अनुभव सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते खेत बचाव अभियान आणि संतुलित खत वापर व्यवस्थापन अभियान 2026 या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी श्री. जालिंदर काळे यांच्या शेतावरील नागली पिकाच्या प्रक्षेत्राला मान्यवरांनी व शेतकर्यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. सुनील अडांगळे यांनी केले तर डॉ. योगेश बन यांनी आभार मानले. याप्रसंगी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रा. अन्सारखान आत्तार, श्री. रवींद्र मस्के, आरडगाव व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि विद्यापीठ, कृषि विभाग यांनी प्रयत्न केले.








