रस्तापूर येथे तीस वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.
रस्तापूर येथे ३० वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; शनी शिंगणापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद परिसरात खळबळ; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
अहिल्यानगर जिल्हा// प्रतिनिधी// संभाजी शिंदे
नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथे ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनिल भानुदास वर्डे (वय ३०, रा. भगवानगड पायथ्याजवळ, खरवंडी कासार, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांनी मंगळवारी (दि. २८ जुलै) सकाळी रस्तापूर परिसरात अज्ञात कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.या घटनेची माहिती मृताच्या मावस भावाने गोरख भानुदास वर्डे यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच शनी शिंगणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
या प्रकरणी बीएनएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत.घटनेचा पुढील तपास शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पोलीसांचे आवाहन :आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कोणत्याही समस्येचे उत्तर नसते. मानसिक तणाव, कौटुंबिक किंवा आर्थिक अडचणी असल्यास कुटुंबीय, मित्र किंवा संबंधित तज्ज्ञांची मदत घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.








