कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार .

कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार .

*डिजिटल कृषीकडे महत्वपूर्ण पाऊल-कुलगुरू डॉ. विलास खर्चे*

 

          कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. या संयुक्त उपक्रमांतर्गत शेतीमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), कृषी रोबोटिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जाईल. याशिवाय, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि जल व्यवस्थापनाच्या आधुनिक मॉडेल्सवर दोन्ही संस्था एकत्र काम करतील. निवडक गावांमध्ये विविध तांत्रिक उपक्रम राबवून त्यांना ‘आदर्श गाव’ म्हणून विकसित केले जाईल. शासनाच्या विविध संबंधित विभागांशी समन्वय साधून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे हा या कराराचा मुख्य उद्देश असून डिजिटल कृषीकडे हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.

 

         कृषी क्षेत्रात आधुनिक आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, संगमनेर व संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (कोपरगाव) या नामांकित संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला. कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर कृषी विद्यापीठाच्या वतीने संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी तर पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे डीन-ॲकॅडेमिक्स डॉ. विक्रांत देविदास गायकवाड, अमृतवाहिनी इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेंटर, संगमनेरचे प्रमुख डॉ. डी. एस. बजाज, तसेच संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोपरगावचे डॉ. राजेंद्रकुमार अमृतराव कापगते यांनी स्वाक्षऱ्या केल्या.  

 

      या करारांतर्गत कृषी क्षेत्रात एआय, मशीन लर्निंग, ड्रोन, रोबोटिक्स आणि आयोटी तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल कृषीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच ड्रोनद्वारे पीक निरीक्षण, आयोटी-आधारित शेती व्यवस्थापन, निर्णय सहाय्यक प्रणाली, संसाधन नकाशे तयार करणे आणि कृषी क्षेत्रातील विविध नव्या उपक्रमांवर संयुक्त संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण राबवले जाणार आहे.  

 

     याप्रसंगी कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. के. ससाणे, नियंत्रक डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुनील कदम आणि कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल उपस्थित होते. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयू (पुणे) कडून कार्यक्रम संचालक डॉ. पारुल जाधव, सहाय्यक प्राध्यापक डॉ. सावित्री जाधव व कार्यक्रम समन्वयक डॉ. साकेत येवलेकर, अमृतवाहिनी सेंटर (संगमनेर) कडून संशोधन समन्वयक डॉ. व्ही. एस. आहेर व प्रा. एम. बी. गुंजाळ तर संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (कोपरगाव) कडून मेकाट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. सिद्धांत संजय कुलकर्णी उपस्थिती होती.