महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीत चुहारा बोर वाणातून समृद्धीची नवी दिशा

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीत चुहारा बोर वाणातून समृद्धीची नवी दिशा

**महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीत ‘चुहारा’ बोर वाणातून समृद्धीची नवी दिशा!**

 

 **कोरडवाहू फळपिकांच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन**

 

       महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत राज्य शासनाचा राबविण्यात येत असलेल्या राज्यव्यापी सेवा संकल्प अभियानांतर्गत राहुरी बुद्रुक, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर येथील प्रगतशील शेतकरी श्री. हिराचंद राधुजी तनपुरे यांच्या बोर फळपिकाच्या प्रक्षेत्रास शास्त्रज्ञांनी भेट देऊन पाहणी केली.

 

    महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वाखाली व संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संकल्प अभियानांतर्गत आयोजित या क्षेत्रभेटीत कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. उत्तम कदम, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्पाचे उद्यानविद्यावेत्ता डॉ. सुभाष गायकवाड, रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे व कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय हजारे यांनी बोर बागेची पाहणी केली.

 

    श्री. तनपुरे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीत ‘चुहारा’ या बोर वाणाची निवड करून १.५ एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. अल्प क्षेत्रात योग्य नियोजन, शास्त्रीय पीक व्यवस्थापन आणि विद्यापीठाचे तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीतून समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या श्री. तनपुरे यांच्या प्रयत्नांचे शास्त्रज्ञांनी कौतुक केले. यावेळी शेतकऱ्यांना बोर पिकातील कीड व रोगांचे विद्यापीठाच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ‘चुहारा’ वाण, सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-२, फुले सुपर बायोमिक्स, फुले बगीसाईड तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले कोरडवाहू फळपिकांचे तंत्रज्ञान यांचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

 

     अल्प क्षेत्रातही योग्य नियोजन आणि विद्यापीठाचे शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास कोरडवाहू फळपिकातून उत्पादन व उत्पन्नाची संधी निर्माण करता येते, हे श्री. तनपुरे यांच्या बोर बागेच्या माध्यमातून अधोरेखित झाले.

 

     यावेळी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी श्री. तनपुरे यांच्या प्रयोगाचे अनुकरण करून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कोरडवाहू फळपिकांची लागवड व शास्त्रीय व्यवस्थापन स्वीकारावे, तसेच कोरडवाहू फळपिकांच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभाग प्रमुख डॉ. उत्तम कदम केले.