संघ कार्यकर्त्यांवरील खोट्या आरोपांप्रकरणी हिंदुत्ववादी आक्रमक — पोलिसांना निवेदन.
संघ कार्यकर्त्यांवरील खोट्या आरोपांप्रकरणी हिंदुत्ववादि आक्रमक — पोलिसांना निवेदन.
संगमनेर प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवारातील कार्यकर्त्यांवर संगमनेर शहरात सातत्याने खोट्या गुन्हेगारी तक्रारी व वैयक्तिक बदनामीचे प्रकार घडत असल्याने संघ परिवाराने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्याकडे निवेदन सादर केले.
या निवेदनात संघ कार्यकर्त्यांवर हेतुपुरस्सर रचलेले खोटे गुन्हे, समाजमाध्यमांवर चाललेला अपप्रचार व कार्यकर्त्यांच्या घरांवर घडवून आणलेले हल्ले या सर्व घटनांचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. संघाच्या मते, वैचारिक लढाईत अपयशी ठरलेले काही राजकीय पुढारी, विशेषतः काँग्रेसशी संबंधित मंडळी, हा बदनामीचा कट रचत आहेत.
निवेदनात सांगितले आहे की, या प्रकारामागे समाजात गुंडगिरी करणारे, बेकायदेशीर धंदे चालवणारे, बनावट संस्था चालवणारे व त्यांना पाठीशी घालणारे काँग्रेसचे राजकीय आश्रयदाते आहेत. वैचारिक वादात पराभूत झाल्यानंतर आता मानसिक दडपण निर्माण करून संघ कार्यकर्त्यांना नामोहरम करण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला.
संघ ही समाजसेवेसाठी समर्पित संस्था असून, खोट्या आरोपांना भीक न घालता संघर्ष करण्यास तयार असल्याचा ठाम इशारा संघ परिवाराने दिला. त्यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या षड्यंत्रांना आता मूग गिळून सहन केले जाणार नाही.
हे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे व शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख हे अधिकारीही उपस्थित होते.

यावेळी संघाचे श्रीराम गणपुले, एस. झेड. देशमुख सर, योगराजसिंग परदेशी, भाऊ जाखडी व पायल ताजने यांनी उपस्थितांना संबोधित करत खोट्या आरोपांवरील रोष व्यक्त केला आणि उपद्रवी व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
संघ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला व सामाजिक शांततेसाठी बाधा आणणाऱ्या दोषींवर तातडीने पावले उचलून कारवाई करावी, अशी मागणी केली.








