चांदा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई ;बेकायदा विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाईने खळबळ

चांदा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई ;बेकायदा विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाईने खळबळ

बेकायदा विदेशी दारूसह १० लाखांची कार जप्त; चांदा येथील घटना तिघांविरोधात गुन्हा दाखल

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने बेकायदा विदेशी दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १० लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी ब्रिझा कार आणि विदेशी दारू असा एकूण १० लाख ८८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

सोनई पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक ४२३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली तसेच दादरा आणि नगर हवेली, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशात विक्रीस परवानगी असलेली विदेशी दारू विनापरवाना वाहतूक केल्याचा आरोप आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजून ११ मिनिटांनी, चांदा, तालुका नेवासा येथे ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत मारुती सुझुकी ब्रिझा कार क्रमांक MH-12-NU-9177 जप्त करण्यात आली. या वाहनाची अंदाजे किंमत १० लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.तसेच पोलिसांनी रॉयल स्टॅग कंपनीच्या १३ बॉक्समधील ६२४ बाटल्या, ज्यांची किंमत ५६ हजार १६० रुपये, तसेच इम्पीरियल ब्ल्यू कंपनीच्या ८ बॉक्समधील ३८४ बाटल्या, ज्यांची किंमत ३२ हजार ६४० रुपये, असा विदेशी दारूसाठा जप्त केला आहे.अशा प्रकारे वाहनासह एकूण १० लाख ८८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे.

या प्रकरणात प्रविण नानासाहेब धाडगे, राजेंद्र बापूराव जावळे आणि संदीप शिवाजी गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही चांदा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथील असल्याचे कागदपत्रात नमूद आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दत्ता गावडे करीत आहेत. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे बेकायदा विदेशी दारूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे संदीप मुटकुळे यांच्या आदेशानुसार संबंधित पोलीस अंमलदार यांनी केली.