एकात्मिक शेती पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल - संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके
*एकात्मिक शेती पध्दतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल*
*- संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके*

शाश्वत शेतीसाठी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाचे महत्त्व मोठे आहे. एकात्मिक शेती पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते तसेच मानवी आरोग्यासाठी आवश्यक असलेली प्रथिने दूध, अंडी व मांसाच्या माध्यमातून उपलब्ध होतात. कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन, महिलांचा शेतीतील सहभाग आणि पशुपालनावर आधारित विविध उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी केले.
सेवा संकल्प अभियान-2026 अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि जय हिंद लोकचळवळ, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मांडवे खुर्द, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर येथे शेळी व मेंढी पालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना डॉ. प्रशांत बोडके बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र शासन सेंद्रिय शेतीचे राज्य सल्लागार डॉ. प्रशांत नाईकवाडी, संगमनेर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर, शेळी-मेंढी पालन, जयहिंद लोकचळचे लहानभाऊ धुळगंड, शेळी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विष्णू नरवडे, मेंढी सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र निमसे, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ. सुनील अडांगळे, साकूर पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उदय वाळुंज व साकूर येथील सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी श्री. केतन जगदाळे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. प्रशांत बोडके मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की शेळीपालनासोबत गांडूळखत, लोकर व इतर पूरक व्यवसायांचे प्रकल्प राबविल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. संगमनेरी शेळीचे संवर्धन व प्रसार करण्याची गरज असून या स्थानिक शेळीच्या उत्पादनक्षमतेचा आणि रोगप्रतिकारक्षमतेचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करताना विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानांचा, निविष्ठांचा आणि उत्पादनांचा शेतकऱ्यांनी वापर करण्यासाठी आवाहन केले. याप्रसंगी डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी कमी खर्चात शेळीपालन करण्यासाठी शेतकऱ्यांनी गटशेतीचा अवलंब करावा, सामूहिक पद्धतीने प्रशिक्षण केंद्रे उभारावीत आणि उपलब्ध सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. भविष्यात शेळीपालनातून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व नियोजनबद्ध व्यवस्थापन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. विष्णू नरवडे, डॉ. रवींद्र निमसे, डॉ. सुनिल अडांगळे यांनी किफायतशरी मेंढी व शेळी पालन या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. उदय वाळुंज यांनी पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध पशुपालनविषयक योजनांची माहिती दिली. श्री. केतन जगदाळे यांनी शेती, पशुपालन, शेळी व मेंढीपालनासाठी उपलब्ध असलेल्या विविध कर्ज व आर्थिक योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्री. लहानभाऊ धुळगंड यांनी मानले. प्रशिक्षणासाठी मांडवे, आश्वी, साकुर, पानोडी या परिसरातील एकूण 800 हुन अधिक शेळी-मेंढी पालक, महिला शेतकरी उपस्थित होते.








