बागायती व कोरडवाहू शेतीसाठी शेतीच्या संवर्धनाचा प्रकल्प महत्त्वाचा उपक्रम ठरेल - कुलगुरू डॉ. विलास खर्चे

बागायती व कोरडवाहू शेतीसाठी शेतीच्या संवर्धनाचा प्रकल्प महत्त्वाचा उपक्रम ठरेल - कुलगुरू डॉ. विलास खर्चे

*राहुरी विद्यापीठ, दि. 29 सप्टेंबर, 2026*

 हवामानातील बदल, जमिनीचा होणारा ऱ्हास व कमी होणारे नैसर्गिक संसाधने यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतीच्या संवर्धनासाठी जमिनीची किमान मशागत, पिकांच्या अवशेषांचा पुनर्वापर व योग्य पीक पद्धतींचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरण व तंत्रज्ञानाचा योग्य वापर महत्त्वाचा ठरणार आहे. बागायती व कोरडवाहू शेतीसाठी शेतीच्या संवर्धनाचा प्रकल्प हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास खर्चे यांनी केले.

 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे महाराष्ट्रातील प्रमुख पीक पद्धतींमध्ये संसाधन उत्पादकता वाढविण्यासाठी आणि हवामानातील बदललास सामोरे जाण्याची क्षमता वाढविण्यासाठी संवर्धनात्मक शेती व मृदा अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या धोरणांचे प्रमाणीकरण या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी उपमहासंचालक (एन. आर. एम.) डॉ. ए. के. सिंग, बारामती येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या कृषि ताण व्यवस्थापन या राष्ट्रीय संस्थेचे संचालक तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य डॉ. सामी रेड्डी, भोपाळ येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या आयआयएसएस चे प्रमुख व मुख्य अन्वेषक डॉ. नरेंद्र कुमार लेंका, परभणी येथील मराठवाडा कृषि विद्यापीठातील पोकराचे प्रधान अन्वेषक डॉ. हरिहर कौसडीकर, अकोला डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील पोकराचे प्रधान अन्वेषक डॉ. श्याम जाधव, राहुरी कृषि विद्यापीठातील मृदाशास्त्र विभाग प्रमुख व पोकराचे प्रधान अन्वेषक डॉ. बी. एम. कांबळे, पोकराच्या कृषिविद्यावेत्ता श्रीमती मनाली तांबडे, विद्यापीठाचे नियंत्रक डॉ. सचिन नांदगुडे, कृषि तंत्रज्ञांनचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र हिले, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उत्तम कदम, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय कोळसे व पोकराच्या राहुरी येथील सह प्रधान अन्वेषक डॉ. रितू ठाकरे उपस्थित होते.

 यावेळी डॉ. ए. के. सिंग मार्गदर्शन करताना म्हणाले की कोरडवाहू शेतीत पाणी व अन्नद्रव्यांची कमतरता दूर करण्यासाठी योग्य जमीन व्यवस्थापन, ठिबक/ तुषार सिंचन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर भर द्यायला हवा. शेतीचे संवर्धन योग्य रीतीने होण्यासाठी तन व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असून शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन योग्य यंत्रसामग्री व तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे. यावेळी डॉ. सामी रेड्डी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की शेतीचे संवर्धन योग्य प्रकारे होण्यासाठी तन,कीड व पोषक द्रव्यांचे शास्त्रीय व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. शेतीचे संवर्धन योग्य प्रकारे होण्यासाठी आवश्यक ते सर्व घटक एकत्रित पॅकेज म्हणून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्यास त्याचा प्रभावी अवलंब होऊ शकतो. यावेळी झालेल्या तांत्रिक चर्चासत्रात डॉ. नरेंद्र कुमार लेका, डॉ. बी. एम. कांबळे, डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. श्याम जाधव व विजय कोळेकर यांनी आपापल्या सेंटरचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. बी. एम. कांबळे यांनी तर प्रास्ताविक डॉ. नरेंद्र कुमार लेंका यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. रितू ठाकरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील पोकरा प्रकल्पाचे अधिकारी, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी तसेच मृदा शास्त्र विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.