सेवा संकल्प अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना ज्वारी पंचसूत्रीचे धडे

सेवा संकल्प अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना ज्वारी पंचसूत्रीचे धडे

*सेवा संकल्प अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना ज्वारी पंचसूत्रीचे धडे*

 महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या प्रेरणेने आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. विजू अमोलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियानाअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मौजे शिंगवे केशव येथे राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या पौष्टिक तृणधान्य प्रकल्पांतर्गत रब्बी ज्वारी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 याप्रसंगी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे यांनी सेवा संकल्प अभियानाची आणि प्रकल्पाची माहिती विशद केली. डॉ. खर्डे यांनी शेतकऱ्यांना या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ज्वारी कृषि विद्यावेत्ता डॉ. दत्तात्रय पाचरणे यांनी रब्बी ज्वारी उत्पादन तंत्रज्ञानाची पंचसूत्री यावर मार्गदर्शन केले. डॉ. पाचरणे मार्गदर्शनात म्हणाले की फुले रेवती, फुले यशोमती हे ज्वारीचे वाण उत्पादनशील असून शेतकऱ्यांनी सुरूवातीला वाफे तयार करून मूलस्थानी पाणी व्यवस्थापन करावे. त्यानंतर जमिनीचा प्रकारानुसार वाण घ्यावे तसेच ॲझटोबॅक्टर, थायोमॅथॉइट बरोबर बीजप्रक्रिया करावी. अधिक उत्पादनासाठी अन्नद्रव्य, रोग व कीड आणि पाणी व्यवस्थापन तसेच कोळपणी गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विषय विशेषज्ञ प्रा. अन्सार अत्तार यांनी फळबाग लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. विषय विशेषज्ञ डॉ. सुनील अडांगळे यांनी दुग्ध व्यवसायाविषयी मार्गदर्शन केले. सहाय्यक कृषि अधिकारी प्रशांत गुंड यांनी कृषि विभागाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. ग्रामविकास अधिकारी कमल म्हस्के यांनी ग्रामविकास उपक्रमाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी बापूराव घोरपडे आणि गाडेकर महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बापूराव घोरपडे यांच्या शेतात फुले यशोमती या रब्बी ज्वारी वाणाच्या पेरणीचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील 50 शेतकरी उपस्थित होते.