छात्र भारती चे प्रांत अधिकरी यांच्या मार्फत मुख्यमंत्री , शिक्षणमंत्री यांना निवेदन

छात्र भारती चे प्रांत अधिकरी यांच्या मार्फत मुख्यमंत्री , शिक्षणमंत्री यांना निवेदन

*छात्र भारती चे प्रांत अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमत्री,शिक्षणमंत्री याना निवेदन*

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची केवळ परीक्षा फी माफ करून चालणार नाही; प्रवेश फी व संपूर्ण शैक्षणिक फी माफ करा — छात्रभारती

 

इयत्ता १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षा शुल्क घेऊ नये; आधीच घेतलेले शुल्क परत करण्याची मागणी

 

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पीक आलेले नसल्याने त्यांच्या उत्पन्नाचे साधनच संकटात आले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

 

या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची केवळ परीक्षा फी माफ करून त्यांची समजूत काढू नका; विद्यार्थ्यांची प्रवेश फी आणि संपूर्ण शैक्षणिक फी माफ करा, अशी मागणी छात्रभारतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

 

सरकारने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काबाबत निर्णय घेतला असला तरी केवळ परीक्षा शुल्क माफ करणे हा पुरेसा आर्थिक दिलासा नाही. परीक्षा शुल्काच्या तुलनेत प्रवेश शुल्क व इतर शैक्षणिक शुल्काची रक्कम मोठी असते. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दिलासा द्यायचा असेल तर त्यांची प्रवेश फी तसेच संपूर्ण शैक्षणिक फी माफ करणे आवश्यक आहे.

 

त्याचबरोबर इयत्ता १०वी व १२वीच्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षा शुल्क आकारले जाऊ नये, अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे.

 

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सवलत किंवा शुल्कमाफी देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला असतानाही अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करण्यात येत असल्याचे छात्रभारतीने म्हटले आहे. काही विद्यार्थ्यांकडून हे शुल्क आधीच वसूल करण्यात आले आहे.

 

“दुष्काळ असताना फी भरायची कुठून?” असा सवाल करत, विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊन नंतर त्यांच्या खात्यावर त्याच रकमेचा परतावा करण्याची प्रक्रिया राबविण्याऐवजी सरकारने सुरुवातीपासूनच शुल्कमाफी लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

छात्रभारतीने शासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत—

 

1. दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे बोर्ड परीक्षा शुल्क आकारू नये.

2. आवश्यक परीक्षा शुल्क शासनाने थेट महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला उपलब्ध करून द्यावे.

3. ज्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आधीच वसूल करण्यात आले आहे, ते शुल्क परत करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना द्यावेत.

4. सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना स्पष्ट निर्देश देऊन कोणत्याही प्रकारची अनधिकृत किंवा अनावश्यक शुल्कवसुली होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

5. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची प्रवेश फी आणि संपूर्ण शैक्षणिक फी माफ करावी.

 

दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलेले असताना विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ आर्थिक अडचणीमुळे थांबू नये. त्यामुळे सरकारने केवळ परीक्षा शुल्कमाफीपुरता मर्यादित निर्णय न घेता दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करून तातडीने ठोस आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी छात्रभारतीने केली आहे.

 

या वेळी छात्र भारती चे राज्य सदस्य मोहम्मद कैफ तांबोळी, अभिषेक वैराळ , सोहम घुले , अनिकेत खरात , धीरज रहाणे , ओम् उगले ,राज वाकळे,साहिल आहेर ,सातपुते रवींद्र , विशाल कडलक,आयुष फुलसुंदर,आदित्य देशमुख ,काळे निखिल ,फटांगरे साहिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते .