मुळा उजव्या कालव्याचा भराव खचला; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

मुळा उजव्या कालव्याचा भराव खचला; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

मुळा उजव्या कालव्याचा भराव खचला; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

 

प्रशासन अलर्ट मोडवर; वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आमदार विठ्ठलराव लंघे घटनास्थळी

 

नेवासा तालुका प्रतिनिधी : मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असतानाच चांदा गावातील बसस्थानकाजवळ कालव्याचा भराव मोठ्या प्रमाणावर खचल्याने शनिवारी दुपारपासून प्रशासनाची धावपळ उडाली. कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असताना भराव खचल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र पाटबंधारे विभागाने वेळीच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना केल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. रात्रीपर्यंत पाण्याची पातळी कमी करण्यात यश आल्याने चांदा, बऱ्हाणपूर, रस्तापूर व वडाळा परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

 

चांदा गावालगतून मुळा उजवा कालवा जात असून सध्या शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. गावाजवळ सुमारे साडेअकराशे ते बाराशे क्युसेसच्या आसपास पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने कालवा दुथडी भरून वाहत होता. अशातच चांदा येथील पुलाजवळ, बसस्थानकाच्या समोरील परिसरात कालव्याचा भराव दुपारपासून हळूहळू खचण्यास सुरुवात झाली. दुपारी तीन ते चारच्या सुमारास काही ग्रामस्थ तसेच पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक श्री. काकडे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.

 

घटनेची माहिती मिळताच घोडेगाव विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केली असता भराव मोठ्या प्रमाणावर खचल्याचे निदर्शनास आले. कालव्यात पाण्याचा मोठा प्रवाह सुरू असल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले होते. त्यानंतर अहिल्यानगर पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंता सायली पाटील यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. नेवासा तहसीलदार संजय बिरादार, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे तसेच शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळातच महसूल, पाटबंधारे व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

 

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कालव्यातील पाण्याचा विसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने उपलब्ध चाऱ्यांमध्ये तसेच आऊटलेटच्या माध्यमातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर चांदा, बऱ्हाणपूर, रस्तापूर व वडाळा या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या ध्वनीक्षेपकावरून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नागरिकांनी जनावरांसह सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले. प्रशासनाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सूचना प्रसारित करण्यात आल्या. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ सतर्क झाले.

 

दरम्यान, परिस्थितीची माहिती मिळताच मोठ्या संख्येने युवक घटनास्थळी दाखल झाले होते. सोनई व शनिशिंगणापूर पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवत परिस्थिती शांततेत हाताळली. पाटबंधारे विभागाने तातडीने आवश्यक मशिनरी घटनास्थळी आणून दुरुस्तीच्या उपाययोजनांना सुरुवात केली. रात्री सुमारे नऊ वाजेपर्यंत कालव्यातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आल्याने संभाव्य धोका टळला.

 

विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने घटनास्थळ सोडले नाही. रात्री दोन वाजेपर्यंत मुख्य अभियंता सायली पाटील यांच्यासह घोडेगाव विभागाचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते. रविवारी सकाळपासूनच भरावाच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू करण्यात आले. मुख्य अभियंता सायली पाटील, मुख्य अभियंता प्रवीण दहातोंडे, घोडेगाव विभागाचे अभियंता एस. बी. पवार, पी. एस. खडसे तसेच कालवा निरीक्षक श्री. काकडे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामावर लक्ष ठेवून होते.

 

दरम्यान, नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेत त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतीसाठीचे आवर्तन तातडीने पूर्ववत करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

आमदार लंघे यांनी या घटनेची माहिती नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनाही दिली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देत असतानाच चांदा व परिसरावर संभाव्य संकट ओढवले होते. मात्र वेळीच प्रशासनाच्या लक्षात घटना आल्याने मोठा अनर्थ टळला. “गणरायाच्या कृपेनेच हे संकट टळले. कालवा फुटला असता तर मोठे संकट निर्माण झाले असते,” अशी भावना आमदार विठ्ठलराव लंघे यांनी व्यक्त केली.

 

कालव्याचा भराव खचल्याची घटना वेळीच लक्षात आली नसती आणि पाण्याचा प्रवाह कायम राहिला असता तर चांदा व परिसरातील गावांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे पाटबंधारे विभाग, महसूल प्रशासन व पोलिसांनी तत्परतेने केलेल्या उपाययोजनांमुळे संभाव्य धोका टळल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.