कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन व दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात साजरा

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन व दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात साजरा

*कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन व दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात साजरा*

*वेळेबरोबर कामाचे योग्य व्यवस्थापन केल्यास जीवनात यशस्वी व्हाल**- सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे*

 अभियंत्यांच्या कामामुळेच हा देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. तुम्ही भविष्यातील प्रत्येक प्रश्नाला योग्य पर्याय देणारे सोलुशन मेकर्स आहात. तुम्हाला जे काम येते ते प्रामाणिकपणे केल्यास तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. महाविद्यालयीन जीवनात संपर्कात येणार्या व्यक्तींचे, कामाचे व वेळेचे योग्य व्यवस्थापन करता येणे हा जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग आहे असे प्रतिपादन डॉ. नानासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांनी केले.

 महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात अभियंता दिन व दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. यशवंत डांगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, विद्यापीठाचे नियंत्रक तथा मृद व जलसंधारण विभाग प्रमुख डॉ. सचिनकुमार नांदगुडे, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे व प्रक्षेत्र संरचना अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. व्ही.पी. पाटील उपस्थित होते.

 यावेळी श्री. यशवंत डांगे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी व अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मजबूत असे 24 किल्ले बांधले. आजच्या अभियंत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा आदर्श स्वीकारला पाहिजे. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या ध्येयाशी प्रामाणिक राहण्याबरोबरच खूप कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी खूप आत्मविश्वासाने करा परंतु वेळ जास्त वाया न घालवता योग्य तो निर्णय घ्या असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी विद्यार्थी तथागत याने भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प देऊन मान्यवरांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कैलास कांबळे यांनी केले. डॉ. डी. डी. पारधे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील फुलसावंगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव श्री. वैभव बारटक्के, इतर कर्मचारी तसेच कृषि अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.